आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:57 IST2019-03-12T19:43:52+5:302019-03-12T20:57:17+5:30
रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.

आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार
मुंबई - सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना दररोज ३ ते ५ जनता दरबार घेण्याच्या सूचना सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्यासाठीच्या वेळेची पाटी लावण्याचे आदेशही मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत. त्यामुळे रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे.
शहरातील नागरिक आणि पोलिसांमधील जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनता दरबार पुन्हा घेण्यात येणार आहे. सत्यपाल सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना ते पोलीस ठाण्यात स्वतः हजार राहून जनता दरबार घेत. नागरिकांसाठी गुन्हेगारीमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर असते. मात्र एखादी अनुचित घटना घडल्यावरही अनेक सर्वसामान्य लोक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. कारण पोलिसांकडून तक्रारदाराला आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा अनुभव काही नागरिकांना अजूनही येतो. त्यामुळे पोलीस आणि सर्वसामान्य जनतेतील अंतर कमी होण्याची मदत या जनता दरबारामुळे होण्यास मदत होते.