चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:47 IST2018-09-22T14:12:04+5:302018-09-22T16:47:38+5:30

या प्रकरणी आरोपींनी चोरट्यांनी मारहाण केल्याने चालकाचा खून झाल्याचा बनाव रचला होता.

Not the thief but owner kills that person | चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून

चोरांनी नाही तर मालकानेच केला 'तो' खून

औरंगाबाद : फ्लॅटमधून पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून मालक आणि त्याच्या मित्रांनीच हायवाचालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. गुरुवारी रात्री चोरट्यांनी मारहाण केल्याने चालकाचा खून झाल्याचा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, गुन्हेशाखेने याचा उलगडा करून आज खऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.  

या बाबत अधिक माहिती अशी की , मालकाने बोलाविल्यामुळे घराबाहेर पडलेला हायवा चालक नितीन भीमराव घुगेचा गुरुवारी रात्री संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मध्यवर्ती जकात नाका परिसरात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे मृताचे मित्र आणि मालकाने पोलिसांना सांगितले. मात्र यानंतर नितीनच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हेशाखेने याप्रकरणातील बारकावे तपासण्यास सुरुवात केली. यातून त्यांना काही संशयास्पद बाबींचा उलगडा झाला आणि ते खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोंचले. तपासात  फ्लॅटमधून पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून नितीनचा मालक आणि त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचे  निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी नितीनचा मालक कंत्राटदार मनोज डवरे पाटील, नील काकासाहेब पाटील, शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांना ताब्यात घेतले आहे.  

मालकानेच रचला कट 
मनोज डवरे हा मनपाचा कचरा वाहतूक करणारा ठेकेदार आहे. गुरुवारी रात्री मनोज आणि त्याचा मित्र नील पाटील याने खुनाचा कट रचला. यानुसार नितीनला त्यांनी कामाचे कारण सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले. यानंतर मनोज, नील , शुभम पाटील आणि दत्ता भांगे यांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नितीनला त्यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. येथेच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मनोजने नितीनच्या भाऊ सचिनला फोन करून तुम्ही घाटीत या त्याचा अपघात झाला असल्याचे सांगितले. सचिन घाटीत गेला असता त्याने नितीनचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या तपासात हा बनाव असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Not the thief but owner kills that person