नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 22:44 IST2020-02-27T22:42:16+5:302020-02-27T22:44:13+5:30
तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय

नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर
मुंबई - पीएनबी बॅँकेला १४ हजार कोटी रुपयांना गंडा घालवून फरारी झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेचा लिलाव आठवडाभर लांबणीवर पडली आहे. तांत्रिक अडचणीमुळे गुरूवार ऐवजी ५ मार्चला बोली लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोदीच्या जप्त केलेल्या विविध प्रकारच्या ११२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यापैकी अतिशय दुर्मिळ व मौल्यवान अशा १५ कलाकृतीसह ४० वस्तूचा लिलाव गुरुवारी करण्याचे नियोजन होते. त्याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. तर दुसऱ्या टप्यातील लिलाव ३ व ४ मार्चला ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचण उदभविल्याने ऐनवेळी २७ फेब्रुवारी रोजीचा नियोजित लिलाव रद्द करुन ५ मार्चला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ३ व ४ मार्च रोजीचा लिलाव ठरल्याप्रमाणे केला जाणार आहे.
परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीचीमुंबईसह देशभरातील विविध कार्यालये व मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. या संपत्तीचा लिलाव करुन थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न आहेत. त्याची जबाबदारी एका कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. मोदीकडे एम.एम. हुसेन यांच्यासह देश व परदेशातील प्रसिद्ध कलाकारांच्या चित्रकृती, तसेच महागडी घड्याळे, हॅण्डबॅग्ज, मोटारी आदीचा समावेश आहे. त्यांची किंमत जवळपास २०० कोटीच्या घरात असून पहिल्या टप्यामध्ये विविध किंमती कलाकृतीवर बोली लावली जाईल, त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अन्य वस्तूचा लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.