अतुल सुभाष प्रकरणात आता रिंकीची एन्ट्री; पत्नी निकिताने केला खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:08 IST2024-12-21T14:07:36+5:302024-12-21T14:08:30+5:30
Atul Subhash And Nikita Singhania : निकिता सिंघानियाने अतुलने तिच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

अतुल सुभाष प्रकरणात आता रिंकीची एन्ट्री; पत्नी निकिताने केला खळबळजनक दावा
इंजिनिअर अतुल सुभाषने तब्बल ९० मिनिटांचा व्हिडीओ जारी करून मृत्यूला कवटाळलं. व्हिडीओ आणि २४ पानी सुसाईड नोटमध्ये अतुलने आरोप केला आहे की, त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवून आत्महत्या करण्यास भाग पाडलं आणि त्याचा सतत छळ केला. यानंतर आता निकिता सिंघानियाने अतुलने तिच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान निकिताने अतुल सुभाषवर फसवणूक केल्याचा आणि त्याच्या तीन गर्लफ्रेंड असल्याचा आरोप केला. निकिताने जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतही या तिघींचा उल्लेख करण्यात आला आहे. तिने आरोप केला की, अतुलचे बंगळुरूमध्ये तीन मुलींशी प्रेमसंबंध होते, ज्यापैकी एकीचे नाव हिना उर्फ रिंकी आहे. अतुल आपले सर्व पैसे तिच्यावर खर्च करत असे.
निकिता सिंघानियाने केलेल्या आरोपांची यादी मोठी आहे. घरातील मेडसोबतही अतुलचं वागणं चांगलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. निकिताने जर तिच्या आईकडे पैसे मागितले तर ते पैसेही अतुल स्वत:कडेच ठेवायचा. निकिताच्या वडिलांनी लग्नात १० लाखांचे दागिने आणि ५ लाख रुपयांची रोकड यासह अनेक गोष्टी दिल्या होत्या, मात्र लग्नानंतर ती सासरच्या घरी पोहोचली तेव्हा अतुलच्या पालकांनी १० लाख रुपये आणि हुंड्याची मागणी सुरू केली असं निकिताने म्हटलं आहे.
निकिताने अतुल सुभाषने तिला खूप मारहाण आणि छळ केल्याचा आरोप देखील केला होता. तिने सांगितले की, कोरोनाच्या काळात तिची आई बंगळुरूला आली होती, तेव्हा अतुलने तिला आईसमोरच मारहाण केली होती आणि त्यामुळे ती जौनपूरला परत गेली होती. अतुलने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.