Nigerians arrested with cocaine worth lakhs of rupees | लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक

लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक

ठळक मुद्दे ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात रविवारी एक नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वसई एलसीबीच्या टीमला मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला पकडले असून पोलिसांना त्याला पकडण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. रस्त्यावर 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी पाऊण तास झटापटी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली पण आरोपीने दोन पोलिसांसह एका खाजगी माणसाचा चावा घेतला आहे. त्याच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

एलसीबीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्वेकडील मनवेल पाडा परिसरातील मोहक सिटीजवळील साई कृपा हॉटेलच्या इथे एक नायजेरियन लाखो रुपयांचे कोकेन विकायला येणार असल्याची माहितीदाराने माहिती दिली होती. या माहितीनंतर एलसीबीच्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. रात्रीच्यावेळी एक नायजेरियन सदर ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण पाऊण तासाच्या झटापटीनंतर त्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. चिमा इबे इव्हे (26) असे आरोपी नायजेरियन नाव असून तो नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातच राहतो. या झटापटीत एलसीबीचे रमेश अलदर याच्या हाताला दोन ठिकाणी, विकास यादव याच्या हाताला एका ठिकाणी तर खाजगी माणसाच्या हाताचा चावा घेतला आहे.

नालासोपारा शहरात पूर्व आणि पच्छिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत अंदाजे 2 ते 3 हजार नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्यामुळे यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.

Web Title: Nigerians arrested with cocaine worth lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.