Newbie dies while learning a bike: Activa hit the wall | दुचाकी शिकताना नवविवाहितेचा मृत्यू : भिंतीला धडकली अ‍ॅक्टिव्हा

दुचाकी शिकताना नवविवाहितेचा मृत्यू : भिंतीला धडकली अ‍ॅक्टिव्हा

ठळक मुद्देनागपूरच्या शांतिनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकी शिकताना अ‍ॅक्टिव्हावरील नियंत्रण सुटल्यामुळे नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री शांतिनगर पोलीस ठाण्यांतर्गत रामसुमेरनगरात घडली. डोक्यावर हेल्मेट नसल्याने गंभीर दुखापत झाली. परिणामत: सुखी संसाराची स्वप्ने पाहण्याआधीच या नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला.
शिवानी युवराज वाणी (२०) असे नवविवाहितेचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली होती. दोन-तीन दिवसांपासून माहेरच्या मंडळींसोबत आनंदात मुक्कामाला होती. तिला दुचाकी चालविणे शिकायचे होते. त्यामुळे शेजाऱ्यांना अ‍ॅक्टिव्हा मागितली. अनुभव नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिला मनाई केली. परंतु शिवानीने प्रॅक्टिस करणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ७ वाजता घराजवळच अ‍ॅक्टिव्हा चालवीत असतानाच अचानकपणे अनियंत्रित होऊन रेल्वे परिसराच्या भिंतीला धडकली. यात तिचे डोके जोरात भिंतीवर आदळले. मोठी जखम झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शिवानीच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. लग्नांतर ती खूप आनंदात होती. तिच्या आईवडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कुटुंबात दोन भाऊ आहेत. लग्नाच्या महिनाभरातच शिवानीला जीव गमवावा लागेल याचा कुणीच विचार केला नव्हता. तिने हेल्मेट घालून कुणाच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅक्टिव्हा चालविणे शिकले असते तर ही घटना घडली नसती. हवालदार सुधीर खुबाळकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Newbie dies while learning a bike: Activa hit the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.