‘नीट’ महाघोटाळ्याची देशभरात ‘लिंक’, सूत्रधार परिमल ‘रॅकेट’मध्ये सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 07:47 IST2021-09-24T07:47:05+5:302021-09-24T07:47:42+5:30

आर. के. एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट विविध शहरांत पालकांशी संपर्क करायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे.

Neet scam Link across the country | ‘नीट’ महाघोटाळ्याची देशभरात ‘लिंक’, सूत्रधार परिमल ‘रॅकेट’मध्ये सक्रिय

‘नीट’ महाघोटाळ्याची देशभरात ‘लिंक’, सूत्रधार परिमल ‘रॅकेट’मध्ये सक्रिय

योगेश पांडे -

नागपूर
: ‘नीट’ (NEET scam) उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे.  नागपूरसह दिल्लीच्या कार्यालयातून रॅकेट सुरू होते. पालकांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध ठिकाणी एजंट नेमले होते. परिमल हा वैद्यकीय प्रवेशाच्या गैरप्रकारांमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय होता व त्याला २०१५ मध्ये अटकदेखील झाली होती, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली.

आर. के. एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट विविध शहरांत पालकांशी संपर्क करायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. या संस्थेचे एक कार्यालय नवी दिल्ली येथील नेहरू पॅलेस मेट्रो स्थानकाजवळ होते. पालकांकडून विद्यार्थ्यांचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ घेऊन ‘डमी’ उमेदवारांच्या सोयीच्या शहरातच परीक्षा केंद्राचा पर्याय दिला जायचा. रांची व दिल्ली येथे डमी उमेदवार बसविण्याचे ठरले. यात दिवाकर, मुन्ना हे परिमलचे  साथीदारही देखील सहभागी होते, असे समजते. 

 परीक्षा देण्यापासून ते प्रवेश करून देण्यापर्यंतच्या पूर्ण ‘सेटिंग’चा या ‘रॅकेट’मध्ये समावेश होता. अशा पद्धतीने परीक्षा देऊन किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, याचा शोध सुरू आहे. 

‘हायटेक कॉपी’त परिमलचा सहभाग -
परिमल हा मूळचा नागपूरचाच असून, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांमध्ये तो अनेक वर्षांपासून आहे. २०१५ साली ‘एआयपीएमटी’ परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईलने कॉपीच्या प्रकाराने शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. त्यातही परिमल सहभागी होता. विद्यार्थी ‘मायक्रो स्पीकर्स’ ‘नॅनो इअर फोन्स’, ‘आयवॉच स्कॅनर’ आदींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवीत होते. हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती. परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपये घेतले होते. 

Web Title: Neet scam Link across the country