नागपूर: हुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी; ९ लाखाचा ऐवज लंपास, घरची मंडळी निद्रिस्त असताना चोरटे घरात सक्रिय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 22:46 IST2021-06-01T22:46:20+5:302021-06-01T22:46:55+5:30
घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला.

नागपूर: हुडकेश्वरमध्ये धाडसी चोरी; ९ लाखाचा ऐवज लंपास, घरची मंडळी निद्रिस्त असताना चोरटे घरात सक्रिय!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
हुडकेश्वर खुर्द परिसरात शितला माता मंदिराजवळ कृपाशंकर मितलाल शाहू (वय ३६) राहतात. एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कृपाशंकर यांचे तीन भाऊ त्यांच्या परिवारासह राहतात. ते पशू आहार आणि किराणा व्यावसायिक आहेत. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि आपआपल्या खोल्यांमध्ये झोपी गेले. मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास कुटुंबातील महिला जाग्या झाल्या. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनकक्षात कपाटात ठेवलेली चार लाखाची रोकड तसेच सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण ९ लाख, १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचे वृत्त परिसरात कळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी ठसे तज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे.