अनूज केशवानीला ड्रग्स पुरविणाऱ्यास गोव्यात अटक, एनसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 13:58 IST2020-09-13T13:54:50+5:302020-09-13T13:58:19+5:30
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी छापे टाकून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित अनूज केशवानी याला अंमली पदार्थ पुरवीत असलयाचेही उघड झाले आहे.

अनूज केशवानीला ड्रग्स पुरविणाऱ्यास गोव्यात अटक, एनसीबीची कारवाई
पणजी - बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्त्या प्रकरणातून सुरू झालेला तपास हा बॉलिवूड मधील अंमली पदार्थ कनेक्शनची पाळेमुळे खोदताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी छापे टाकून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित अनूज केशवानी याला अंमली पदार्थ पुरवीत असलयाचेही उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्याचे नाव क्री कॉस्ता असे असून तो दक्षिण गोव्यात कुडतरी येथे राहत होता. या ठिकाणी दोन घरात एनसीबीच्या पथकाने छापामारी केली. अटक करण्यात आलेला कॉस्ता याचे संबंध सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गांजा पुरवठ्यासाठी अटक करण्यात आलेल्या अनूज केशवानी याच्याशी आढळून आले आहे. केशवानीला अंमली पदार्थ हाच पुरवित होता असेही एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान शनिवारी हा छापा टाकण्यात आला होता. परंतु छाप्या बाबत गुप्तता राखण्यात आली होती. राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी गोव्यात एनसीबीचे छापे सुरू असल्याच्या बातम्या प्रसारीत केल्या होत्या, परंतु हे छापे गोव्यात नेमके कुठे सुरू आहेत याची माहिती एनसीबीने प्रसार माध्यमांना लागू दिली नव्हती. छापामारी पूर्ण झाल्यावर आणि संशयिताला अटक करण्यात आल्यावर शनिवारी रात्री उशिरा ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.