Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:20 IST2025-09-11T12:20:23+5:302025-09-11T12:20:52+5:30
Navya Malik : ड्रग्ज रॅकेटमागे हॉटेल, पब-क्लब चालक आणि त्यांच्या मॅनेजरचा मोठा हात आहे. त्यांनी तरुणींचा ड्रग्ज तस्कर म्हणून वापर केला.

Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
छत्तीसगड ड्रग्ज तस्करी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ड्रग्ज क्वीन नव्या मलिकच्या संपर्कात आलेल्या ८५० श्रीमंत लोकांचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून असं समोर आलं आहे की, ड्रग्ज रॅकेटमागे हॉटेल, पब-क्लब चालक आणि त्यांच्या मॅनेजरचा मोठा हात आहे. त्यांनी तरुणींचा ड्रग्ज तस्कर म्हणून वापर केला.
चौकशीदरम्यान आरोपी हर्ष आहुजाने खुलासा केला आहे की, सुरुवातीला क्लबमध्ये येणाऱ्या श्रीमंत लोकांशी मुलींची मैत्री करून दिली जात असे. त्यानंतर मुली या तरुणांना ड्रग्जचं सेवन करायला भाग पाडायच्या. त्यानंतर त्या त्यांना त्यांचे ग्राहक बनवत असत. नव्या मलिक आणि विधी अग्रवाल देखील अशा प्रकारे त्यांच्या ड्रग्ज व्यवसायाचा प्रसार करत असत.
हर्ष आहुजाने आणखी एक खुलासा केला आहे की, इंटीरियर डिझायनर्स नव्या मलिक आणि विधी अग्रवाल या गेममध्ये फक्त मोहरे आहेत, त्यांच्या मागे एक मोठी गँग आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील मोठे माफिया ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी आहेत.
नव्या अनेक श्रीमंत लोकांच्या संपर्कात
नव्या मलिक हॉटेल, पब आणि क्लबमध्ये श्रीमंत लोकांशी मैत्री करायची आणि नंतर त्यांना ड्रग्जसाठी प्रवृत्त करायची. नव्या मलिकच्या फोनमध्ये अनेक श्रीमंत लोकांचे नंबर सापडले आहेत. त्यापैकी काही आमदारांची आणि काही माजी मंत्र्यांची मुलं आहेत. याशिवाय दारू व्यावसायिकांचे मुलं आणि इतर मोठ्या लोकांचाही समावेश आहे. तथापि पोलिसांनी त्यापैकी कोणालाही अद्याप अटक केलेली नाही.
हर्ष आहुजा नव्याकडून खरेदी करायचा ड्रग्ज
चौकशीदरम्यान हर्ष आहुजाने सांगितलं की, त्याने पहिल्यांदाच दिल्लीच्या मोनू बिश्नोईकडून ड्रग्ज ऑर्डर केले होते. त्यानंतर तो नव्याकडून ड्रग्ज खरेदी करायचा. हर्ष आहुजाच्या खुलाशानंतर संपूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. हर्ष आहुजा हा नव्या मलिकचा शेजारी होता.