रात्री दादा वहिनीच्या मध्ये झोपत होती नणंद; निकिता महाना मृत्यू प्रकरणात बहिणीचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:45 IST2025-10-30T15:44:33+5:302025-10-30T15:45:37+5:30
सोशल मीडियावर मुलीला न्याय मिळवण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. #JusticeForNikitaMahana नावाने कॅम्पेन निकिताच्या कुटुंबाने सुरू केले आहे.

रात्री दादा वहिनीच्या मध्ये झोपत होती नणंद; निकिता महाना मृत्यू प्रकरणात बहिणीचा मोठा दावा
लखनऊ येथील सिमेंट व्यावसायिक पार्थ महानाच्या पत्नी निकिता यांचा १८ ऑक्टोबरला संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये दिल्लीतील निकिताचे लखनऊ येथील व्यावसायिक पार्थसोबत लग्न झाले होते. निकिताच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी पार्थवर अनेक खळबळजनक आरोप लावले होते. निकिताची हत्या झालीय असा दावा तिच्या कुटुंबाने केला. या हत्येत पार्थसह त्याच्या कुटुंबाचा सहभाग आहे असं निकिताच्या कुटुंबाने म्हटलं.
आता या प्रकरणात निकिताच्या कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मुलीला न्याय मिळवण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. #JusticeForNikitaMahana नावाने कॅम्पेन निकिताच्या कुटुंबाने सुरू केले आहे. जर आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही तर दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. आमच्या मुलीला हुंड्यासाठी छळलं जात होते. लग्नानंतर निकिताच्या सासरच्यांनी १५ लाख हुंडा मागितला होता. घटनेच्या दिवशी पार्थने निकिताच्या बहिणीला ३ वाजता फोन केला होता. त्यावेळी व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा निकिता जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती असा आरोप निकिताची बहीण मुस्कान यांनी केला.
पार्थ आणि त्याच्या कुटुंबाने निकिताला वेळेवर हॉस्पिटलला नेले नाही. निकिताच्या मृत्यूची बातमी तिच्या आईने पार्थच्या नातेवाईकांना सकाळी ७ वाजता फोन केला तेव्हा समजली. पार्थचा व्यवसाय संपला होता. तो कायम नशेत राहायचा. नशेच्या व्यसनामुळे पार्थचा व्यवसाय बर्बाद झाला होता असं मुस्कानने सांगितले. त्याशिवाय पार्थच्या बहिणीवरही मुस्कानने गंभीर आरोप केले. श्रेया जेव्हा कधीही लखनऊला यायची, तेव्हा पार्थ आणि निकिता यांच्यामध्ये झोपायची. अखेर श्रेया असं का करायची, अशी कोणती नणंद दादा वहिनीसोबत असे करते असा सवाल तिने उपस्थित केला.
दरम्यान, निकिता महाना मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पती पार्थला अटक करून जेलला पाठवले आहे. त्याशिवाय पार्थच्या कुटुंबातील सदस्यांचा या घटनेत काही हात आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती डीसीपी निपुण अग्रवाल यांनी दिली.