Mutual Fundमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली विधवा महिलेस ३२ लाखास फसवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 23:00 IST2021-10-11T22:59:07+5:302021-10-11T23:00:02+5:30
माहिती मिळाल्याने सावित्री यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा मातेश्वर राजपत गिरी याने त्यांना गाठले.

Mutual Fundमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली विधवा महिलेस ३२ लाखास फसवले
मीरारोड - दोन मुलींच्या लग्न आणि शिक्षणासाठी ठेवलेले पैसे एका परिचितानेच म्युचल फंडात गुंतवणूक करतो सांगून ३२ लाख ४६ हजारांना फसवल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरारोड मध्ये राहणाऱ्या सावित्री कोयारी यांच्या पती व भावाचे अपघाती निधन झाल्याने पतीच्या विम्याचे पैसे मिळाले होते. ते त्यांनी मालमत्ता खरेदीत गुंतवले होते. २०१८ साली सावित्री यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा मातेश्वर राजपत गिरी (४०) रा. एमआयजी कॉलनी, वांद्रे याने त्यांना गाठले. म्युचल फंडात आपण काम करत असून अनेकांना त्यांचे पैसे गुंतवून चांगला फायदा मिळवून दिला आहे. तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला देखील चांगला नफा मिळवून देणार असे आश्वासन मातेश्वर ने दिले.
सावित्री यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणुकीसाठी ५१ लाख ५० हजार रुपये त्याच्या कंपनीच्या नावे २०१८ मध्ये एनएफटी व चेकने दिले. परंतु गुंतवणुकीची कोणतीच कागदपत्रे मात्र त्याने दिली नाहीत. सावित्री यांनी आपली गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावला असता त्याने थोडीथोडी करत काही रक्कम दिली. मात्र उर्वरित ३२ लाख ४६ हजार देण्यास टोलवाटोलवी करत असल्याने अखेर सावित्री यांनी पोलिसात तक्रार केली. नया नगर पोलिसांनी मातेश्वर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.