गूढ कायम! अख्खी विहिर रिकामी केली; 'त्या' मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:04 IST2025-03-14T13:04:15+5:302025-03-14T13:04:49+5:30
दाणेवाडीतील या प्रकरानंतर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यातून ६ जणांना ताब्यात घेतले आहे.

गूढ कायम! अख्खी विहिर रिकामी केली; 'त्या' मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी होणार
अहिल्यानगर - श्रीगोंदाच्या दाणेवाडी इथं विहिरीत आढळलेल्या मृतदेहाला शीर, दोन हात, एक पाय नाही त्यामुळे पोलिसांना तपासात स्पष्ट दिशा मिळत नाही. दाणेवाडीतून ६ मार्चपासून गायब माऊली गव्हाणे याचे वडील सतीश गव्हाणे यांची शुक्रवारी डीएनए चाचणी घेण्यात आली. बुधवारी रात्री त्या विहिरीचे पाणी काढण्यात आले, मात्र मृतदेहाचे शीर, पाय, हात यापैकी काहीच सापडलेले नाही. हे अवयव तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
मृतदेहाच्या कंबरेला दोन पदरी करदोडा आहे. माऊली गव्हाणे यालाही दोन पदरी करदोडा होता त्यामुळे हा मृतदेह माऊली गव्हाणे याचा असावा असा संशय पोलिसांना आहे.बुधवारी सकाळी विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा सुरू केला होता. नदीपात्र जवळ असल्याने विहिरीतील पाणी उपसताना प्रचंड कसरत करावी लागली. अखेर रात्रभर विहिरीतून पाणी उपसा सुरू होता. दाणेवाडीतील या प्रकरानंतर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यातून ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
कटरने कापले अवयव
मयताचे शीर, हात, पाय हे झाडे कट करण्याच्या स्वयंचलित कटरने कट केले असावेत असं प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे दाणेवाडी येथील ग्रामस्थांबरोबरच पोलीसही सुन्न झाले आहेत. माऊली गव्हाणे हा शिरूर येथील सीटी बोरा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होता. सहा महिन्यापूर्वी त्याचे कॉलेजमध्ये मित्रांशी भांडणे झाली होती. ही भांडणे कशावरून आणि कुणाशी झाली याचाही तपास पोलीस करणार आहेत. त्यातून काही माहिती समोर येईल का हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान, गव्हाणेवाडी येथील विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीचे संपूर्ण पाणी काढले, मात्र मृतदेहास नसलेल्या अवयवांपैकी एकही अवयव सापडला नाही. पोलिसांनी माऊली गव्हाणे याचे वडील सतीश गव्हाणे यांची डीएनए करण्याचा निर्णय घेतला आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आला की चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी दिली.