मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:35 IST2025-09-25T11:35:25+5:302025-09-25T11:35:47+5:30
ज्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. त्याच दिवशी पत्नी, मुलासोबत शिवाजी नगर पोलीस स्टेशनबाहेर त्यांचा वाद झाला होता.

मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
मुंबई - काही महिन्यांपूर्वी वडाळा येथील ट्रक टर्मिनलजवळ मुंबई पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सूर्यवंशीचा मृतदेह सापडला होता. रक्तबंबाळ झालेला हा मृतदेह पाहून कदाचित एखाद्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा जीव गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले त्यानंतरही फार काही पोलिसांच्या हाती लागले नाही. परंतु आता ४ महिन्यांनी या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.
या मृत पोलीस कॉन्स्टेबलला पत्नी आणि मुलाने बेदम मारले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह अशाप्रकारे फेकला जसं एखाद्या अपघातात त्यांचा जीव गेल्याचं वाटून येईल. तपासानंतर आता पोलिसांनी पत्नी आणि मुलाला अटक केली आहे. स्मिता सूर्यवंशी आणि प्रतिक सूर्यवंशी असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रतिक्षानगर पोलीस अधिकारी कॉलनीत प्रवीण सूर्यवंशी पत्नी आणि मुलासह राहत होते. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ते ड्युटीला होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
प्रवीणने भावाला दिले होते संकेत
तपासात, प्रवीणचा भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी दावा केला की, प्रवीणचा मृत्यू आकस्मिक नाही, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीणचे पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्यासोबत वाद सुरू होते. त्यात आर्थिक वादामुळे बऱ्याचदा भांडणे व्हायची. मृत कॉन्स्टेबलच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरावर ३८ जखमा होत्या. त्यातून अधिकचा रक्तस्त्राव होऊन प्रवीण यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले होते.
ज्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. त्याच दिवशी पत्नी, मुलासोबत शिवाजी नगर पोलीस स्टेशनबाहेर त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर घरी गेल्यानंतर या दोघांनी मिळून प्रवीण यांना मारहाण केली. प्रवीण यांनी त्यांचे एटीएम कार्ड धुळ्यात राहणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाकडे दिले होते. त्यावरूनच पत्नी आणि मुलाने प्रवीण यांच्याशी वाद घातला. या वादात पत्नी, मुलाने प्रवीण यांना बेदम मारले. त्यात प्रवीण सूर्यवंशी यांना धक्का लागून ते खिडकीच्या काचेवर आपटले. त्यात काच फुटली आणि प्रवीण जखमी झाले. या घटनेनंतर पत्नी-मुलाने प्रवीण यांना हॉस्पिटलला नेण्याऐवजी तिथेच सोडले.
दरम्यान, या घटनेत तपासात आम्हाला एक सुसाइड नोट आढळली, ज्यात त्यांनी माझ्या मृत्यूला कुणी जबाबदार नाही असं प्रवीणने लिहिल्याचे म्हटलं आहे. परंतु या सुसाइड नोटवर पोलिसांना संशय आला. पत्नी स्मिता किंवा मुलगा प्रतिक या दोघांपैकीच कुणीतरी ही नोट लिहिली असावी. त्या आधारेच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.