दिल्लीतील वजिराबाद येथे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभवच्या हत्येने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वैभवचे वडील विकास गर्ग यांनी मुलाच्या हत्येनंतर टाहो फोडला. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. माझ्या मुलाला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. माझ्या कुटुंबाचा एकमेव आधार, वंशाचा दिवा गेला असं म्हटलं आहे. वैभवला पोलीस व्हायचं असल्याने तो रोज व्यायाम करायचा. त्याची उंची ६ फूट होती. तीन दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं. अचानक सर्व उद्ध्वस्त झालं असं वैभवच्या आईने सांगितलं.
विकास गर्ग यांनी मुलाच्या अपहरणापासून ते खंडणी कॉल आणि हत्येपर्यंतच्या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं. "वैभव २३ मार्च रोजी संध्याकाळी ७:२५ वाजता घराबाहेर पडला होता. त्याने त्याच्या आईला सांगितलं होतं की १५ ते २० मिनिटांत परत येईन. मी कामावर गेलो होतो. रात्री ९.३० वाजता कामावरून घरी परत आलो तेव्हा पत्नीने वैभवचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचं सांगितलं."
"वैभवचा फोन आला नाही"
"मला वाटलं की, फोनची बॅटरी संपली असावी, कारण असं अनेक वेळा घडलं. जेव्हा फोनची बॅटरी संपली तेव्हा तो मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल करायचा. त्या रात्री कुटुंबातील सदस्यांनी ११ वाजेपर्यंत वाट पाहिली. वैभवचा फोन आला नाही. मी रात्री ११ ते १२ च्या सुमारास चौकशी केली. जेव्हा काहीच माहिती मिळाली नाही तेव्हा थेट पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सर्व माहिती दिली."
"तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे"
"सोमवारी (२४ मार्च) दुपारी १:४० वाजता वैभवच्या नंबरवरून खंडणीचा फोन आला. फोन करणाऱ्या मुलाने म्हटले, तुमच्याकडे तीन दिवसांचा वेळ आहे, १० लाख रुपये खंडणी द्या. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, जर तुम्ही पोलिसांना सांगितलं तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू. हे ऐकून मला धक्काच बसला. यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. मोबाईलही बंद झाला. त्यानंतर दुसरा कोणताही फोन आला नाही" असं विकास गर्ग यांनी सांगितलं आहे. वैभवचं अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.