हवाल्याचा पैशातून तरुण व्यापाऱ्याचा खून, मोटारसायकल आडवी लावून घातला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 23:59 IST2021-11-26T23:59:45+5:302021-11-26T23:59:57+5:30
Crime News: हवाल्याच्या पैशातून तरुण कापूस व्यापाऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना जळगाव- धुळे महामार्गावरील पाळधीनजीकच्या तिरुपती कंपनीसमोर शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या व्यापाऱ्याकडे १० ते १२ लाखांची रक्कम होती.

हवाल्याचा पैशातून तरुण व्यापाऱ्याचा खून, मोटारसायकल आडवी लावून घातला वाद
जळगाव : हवाल्याच्या पैशातून तरुण कापूस व्यापाऱ्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना जळगाव- धुळे महामार्गावरील पाळधीनजीकच्या तिरुपती कंपनीसमोर शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या व्यापाऱ्याकडे १० ते १२ लाखांची रक्कम होती.
स्वप्नील रत्नाकर शिंपी (२७, रा.फरकांडे ता. एरंडोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कापसाचा व्यापारी होता. कासोदा येथे त्याचे धनदाई ट्रेडर्स हे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तो आणि त्याच्याकडे काम करणारा दिलीप राजेंद्र चौधरी असे दोघे जण चारचाकीने (क्र. एम.एच. ०१ एएल ७१२७)जळगावात आले होते. जळगावातील काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास फरकांड्याकडे निघाले होते. सोबत असलेल्या बॅगमध्ये १० ते १२ लाखांची रक्कम होती.
वाटेत पाळधीनजीक दोन ते तीन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावली आणि आम्हाला कट का मारला म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने कारचा दरवाजा उघडून पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. त्यास स्वप्नील याने विरोध केला. त्यावरुन पुन्हा वाद सुरु झाला. त्याचवेळी एकाने स्वप्नील याच्या मांडीवर व पाठीवर चाकूने वार केला. या झटापटीत किरकोळ मार लागल्याने राजेंद्र हा तिथून पळाला. जखमी अवस्थेत पैशाची बॅग घेऊन स्वप्नील हा खाली उतरला. आजूबाजूला लोक व वाहनेही थांबत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. जमलेल्या लोकांनी जखमी स्वप्नील यास रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात आणले. तिथून त्याला जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
स्वप्नील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आहेत. पत्नी गरोदर आहे. वडीलही कापसाचे व्यापारी आहेत. दिलीप चौधरी हा ११ वर्षापासून स्वप्नीलकडे कामाला आहे. याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याने जिल्हा रुग्णालयात पत्रकारांना घटनेची माहिती दिली.