चोरी करण्यास नकार दिल्याने हत्या; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 22:52 IST2019-02-12T22:50:14+5:302019-02-12T22:52:29+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष 6च्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अन्वर मिया शेख उर्फ अनु कोला (34) याला अटक केली.

चोरी करण्यास नकार दिल्याने हत्या; आरोपीला अटक
मुंबई - चोरी करण्यास नकार दिला म्हणून ३५ वर्षीय फकीर मोहम्मद उर्फ सर्फराजची हत्या करण्यात आल्याची घटना ट्राॅम्बे परिसरात काल घडली. गुन्हे शाखेच्या कक्ष 6च्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अन्वर मिया शेख उर्फ अनु कोला (34) याला अटक केली.
ट्राॅम्बे येथील चित्ता कॅम्प परिसरात बी सेक्टर, एच 2 लाईन येथे फकीर मोहम्मद आणि अन्वर शेख हे दोघे राहतात. दोघे नातेवाईक असून एकत्र बस आणि रेल्वेमध्ये पाकीट मारणे सारख्या चोऱ्या करतात. काही दिवसांपूर्वी दोघांना पुणे पोलिसांनीअटक केली होती. नंतर दोघे जामिनावर बाहेर आले. तेव्हापासून फकीर याने चोरी न करण्याचे ठरविले. वारंवार सांगूनही फकीर चोरी करण्यासाठी येण्यास नकार दिला. याच कारणावरून चोरी करण्यास जात नाही आणि चोरीचा माल आणून देत नाही म्हणून सोमवारी दुपारी दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान अन्वरने फकीर आणि त्याच्या पत्नीला मारहाण केली. त्याने चाकूने फकीर याच्यावर वार केले. जखमी असलेल्या फकीरला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर पळालेल्या अन्वर याला गुन्हे शाखा कक्ष 6च्या पथकाने आज शोधून काढत जेरबंद केले.