बैल तुरीच्या शेतात शिरला; 70 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्याचा खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 20:19 IST2023-01-29T20:18:12+5:302023-01-29T20:19:25+5:30

क्षुल्लक वाद : आरोपी वृध्द अटक

Murder of younger brother in Dhanora Shikra Shivara amravati | बैल तुरीच्या शेतात शिरला; 70 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्याचा खून केला

बैल तुरीच्या शेतात शिरला; 70 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्याचा खून केला

अमरावती: बैल तुरीच्या शेतात शिरल्याच्या कारणावरून ७० वर्षीय भावाने आपल्या ६० वर्षीय सख्ख्या धाकट्या भावाचा खून केला. २८ जानेवारी रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास धानोरा शिक्रा शिवारात ही घटना घडली. राजेंद्र महादेव करडे (६०, बेलोरा धामक, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा मोठा भाऊ हरिभाऊ महादेव करडे (७२, बेलोरा धामक) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

             पोलीस सुत्रानुसार, २८ जानेवारी रोजी दुपारी राजेंद्र महादेव करडे यांचे बैल आरोपी हरिभाऊ करडे यांच्या तुरीचे शेतात गेले. म्हणून आरोपी हरिभाऊ यांनी राजेंद्र यांना शेतशिवारातच लाथा बुक्क्या, दगड व काठीने मारहाण करून खाली पाडले. त्यांच्या पोटात बुक्क्या मारल्या व छातीवर बसले. जीव वाचवत राजेंद्र हे कसेबसे घरी पोहोचले. या घटनेबाबत त्यांनी मुलीला सांगितले. दवाखान्यात घेऊन चला, अशी सुचना त्यांनी कुटुंबियांना केली. त्यांना तातडीने नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र तोपर्यंत त्यांचा प्राण गेला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी २९ जानेवारी रोजी पहाटे ४.५० च्या सुमारास मृताच्या मुलीच्या तक्रारीवरून आरोपी हरिभाऊ करडेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तातडीने अटक केल्याची माहिती नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार विशाल पोळकर यांनी दिली.

Web Title: Murder of younger brother in Dhanora Shikra Shivara amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.