प्रेमाला नकार दिल्याने प्रियकाराकडून प्रेयसीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 19:53 IST2020-04-25T19:50:06+5:302020-04-25T19:53:49+5:30
बाणावलीतील घटना: दुसऱ्याबरोबर प्रेम करते म्हणून गळा आवळला

प्रेमाला नकार दिल्याने प्रियकाराकडून प्रेयसीची हत्या
मडगाव: प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून बाणावली येथील मेलबर्न फर्नाडिस (22) या युवकाने आपली प्रेयसी जेनिफर गोन्सालविस (24) हिचा गळा आवळून खून करण्याची घटना शुक्रवारी दुपारी बाणावली मोती डोंगर या परिसरात घडली असून रात्री उशिरा हा युवक कोलवा पोलिसांना शरण आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बाणावली येथील मेलबर्न फेर्नांडिस या 24 वर्षीय युवकाचे मडगावातील जेनिफर गोन्सालविस या युवतीशी प्रेमाचे बंधन जुळले होते. मागची 4 वर्षे त्यांचे प्रेम चालू होते. मेलबर्न एका तारांकित हॉटेलात काम करत होता . मात्र हल्लीच त्याला कामावरून कमी केल्याने तो बेकार होता. कोम्ब मडगाव येथे राहणारी जेनिफर मडगावात एका सरफाच्या दुकानावर सेल्सगर्ल म्हणून कामाला होती.
संशयिताने पोलिसांना दिलेल्या जबानीत आपल्या प्रेयसीची हल्लीच्या दिवसात आणखी एका मुलाकडे ओळख झाली होती. हा युवक जहाजावर काम करत होता. त्यामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती. यामुळेच मेलबर्न दुखावला गेला होता. शुक्रवारी ती युवती त्या आपल्या नव्या दोस्ताशी बोलत असल्याचे पाहून मेलबर्नचे पित्त खवळले. त्याने तिला जवळच्याच मोती डोंगरावर बोलावून घेतले. दुपारच्या 2 च्या सुमारास मोती डोंगरावरील पायऱ्या वर ती दोघे बसली असता मेलबर्नने आपल्या त्या प्रेयसीला त्या युवकाकडे असलेल्या संबंधावीशी विचारले असता तिनेही आपण त्या मुलाकडे लग्न करणार असे मेलबर्नला सांगितले. त्यामुळे रागाने मेलबर्नने प्रथम हाताने आपल्या प्रेयसीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला नंतर आपला गंजीफ्रॉककडून त्याने तिचा गळा आवळला. त्यानंतर मृतदेह तिथेच टाकून तो आपल्या घरी आला. घरी सायंकाळी त्याने आपल्या घरच्यांना आपण केलेल्या कृत्याची माहिती दिल्यानंतर त्याला पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री उशिरा कोलवा पोलिसांना तो शरण आला नंतर त्याला अटक केली अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.
दक्षिण गोव्यातली दुसरी घटना
प्रेम संबंधाना नकार दिल्यामुळे आपल्या प्रेयसीचा खून करण्याची दक्षिण गोव्यातील मागच्या काही दिवसातील ही दुसरी घटना असून यापूर्वी बायथेखोल बोरी येथे एका अल्पवयीन मुलीचा अशाच प्रकारे गळा आवळून खून केला होता. समाज सेविका आवदा व्हिएगस यांनी या अशा वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना या मुलांना कुणी नको म्हटलेले चालत नाही असे म्हटले आहे. मुलींनाही आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे ही बाब हे युवक मानायला तयार नाहीत. अजूनही मुलींकडे भोग वस्तू म्हणूनच पाहिले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.