साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:48 IST2025-12-13T18:48:10+5:302025-12-13T18:48:44+5:30
लग्नानंतर अवघ्या आठव्याच दिवशी एक नववधू आपल्या प्रियकरासोबत सासरहून पळून गेली.

फोटो - आजतक
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील तारापूर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या आठव्याच दिवशी एक नववधू आपल्या प्रियकरासोबत सासरहून पळून गेली. नवरी अचानक गायब झाल्यामुळे सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांमध्ये खळबळ उडाली आहे. पती आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
तारापूर पोलीस स्टेशन हद्दीतील साढी गावाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानिकपूर गावातील रहिवासी संतोष कुमार झा यांची मुलगी स्नेहा कुमारी हिचा विवाह साढी गावातील विजय झा यांचा मुलगा जितेंद्र झासोबत १ डिसेंबर रोजी हिंदू रितीरिवाजानुसार झालं होतं. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस सामान्य होते, पण १० डिसेंबरच्या सायंकाळी अचानक स्नेहा गायब झाली.
रात्री उशिरापर्यंत तिचा पत्ता न लागल्याने पती जितेंद्र झा आणि कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला, नातेवाईकांशी संपर्क साधला, पण स्नेहाचा कुठेही सुगावा लागला नाही. यानंतर सासरच्या लोकांनी याबद्दल स्नेहाच्या माहेरच्या लोकांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबांनी मिळून स्नेहाच्या फोनवर आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
या प्रकरणात तेव्हा नवा ट्विस्ट आला, जेव्हा स्नेहाची आई सोनी देवी यांनी तारापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी झारखंडमधील धनबाद येथील रहिवासी असलेल्या कुंदन यादववर आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कुंदन यादव आणि स्नेहा यांच्यात पूर्वीपासून प्रेमसंबंध होते.
स्नेहाच्या आईने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या मुलीला त्याच प्रियकराने सासरच्या घरातून पळवून नेले आहे. नवरीची सासू अंजना देवी आणि इतर नातेवाईकांनी सांगितले की, लग्नानंतर स्नेहाचे वर्तन अगदी सामान्य होते. ती एका आदर्श सुनेप्रमाणे घरात राहत होती. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, स्नेहा अनेकदा कानात इअरफोन लावून कोणाशी तरी बोलायची, पण कोणालाही संशय आला नाही.
नातेवाईकांनी सांगितले की, ज्या दिवशी स्नेहा पळून गेली, त्या दिवशी सायंकाळी तिने स्वतः चहा बनवून सर्वांना पाजला आणि एका लहान मुलाला शिकवतही होती. ती अचानक गायब झाली. नंतर समजले की स्नेहा घरातून सर्व दागिनेही सोबत घेऊन गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.