४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:35 IST2025-11-26T06:34:45+5:302025-11-26T06:35:17+5:30
कुठे होती? कशी सापडली? अथक शोधमोहिमेची सुखद सांगता

४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली
मुंबई : एका चिमुकलीच्या शोधासाठी पोलिसांची सहा महिन्यांची अथक मोहीम. एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात... तिचा तो चुरगाळलेला फोटो दाखवत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका अनाथालयातून दुसऱ्या अनाथाश्रमात... तर दुसरीकडे, ती कुठे असेल? कशी असेल? सापडेल की नाही? या प्रश्नांनी तिच्या वडिलांची झोप हिरावून घेतलेली. आईनं तर अन्न टाकलेलं... गेले सहा महिने हे दाम्पत्य आदितीच्या (बदललेले नाव) विरहात होरपळत होतं... काय घडलं होतं आदितीच्या बाबतीत?
ती २० मेची रात्र होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नेहमीचीच वर्दळ. वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरहून आलेल्या एका दाम्पत्याने फलाटावरच अंग टाकलं होतं. चार वर्षांची आदिती आईच्या कुशीत गाढ झोपली होती. त्याचवेळी एका क्षणी तिच्या आईचा डोळा लागला आणि तेथेच घात झाला. आई जागी झाली तेव्हा हादरून गेली... तिच्या कुशीतून आदिती बेपत्ता होती.
आता तिचा शोध घेणं हे पोलिसांचं काम होतं. उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकरनगर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. अपहरणकर्त्याने आईच्या कुशीतून आदितीला उचलून वाराणसीला नेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं. पोस्टर्स, हँडबिल्स, लोकांकडे विचारणा... जणू आपलंच लेकरू हरवल्यासारखा अथक आणि अखंड शोध सुरू होता... झोपडपट्ट्या, गल्ल्या-मोहल्ले, रेल्वे स्टेशनं, अनोळखी लोक अशा सर्वांना आदितीचा फोटो दाखवत पोलिसांनी तीन वेळा वाराणसी शहर पालथं घातलं, पण व्यर्थ.
अखेर वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश साबळे व श्रीकांत आदाटे यांच्या मार्गदर्शनात ९ नोव्हेंबरला उपनिरीक्षक सुरज देवरे आणि रामप्रसाद चंदवाडे यांचे विशेष पथक पुन्हा वाराणसीला रवाना झालं. तेथे १०-१२ दिवस ठाण मांडून बसलं. पोलिसांनी एक शक्कल लढवली. अपहरण झालेली मुलगी मराठी बोलते, अशी माहिती वाराणसीभर सर्वत्र व्हायरल करण्यात आली. जाहिरातींमध्येही तसा उल्लेख केला गेला. तेथील प्रसार माध्यमे, संस्थांची मदत घेतली गेली. अखेर एका स्थानिक पत्रकाराने आदितीचा फोटो पाहून ती तिथल्या एका अनाथालयात असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अनाथाश्रमात पोहोचले तेव्हा सहा महिन्यात आपलं नाव विसरलेली आदिती ‘काशी’ हे नवं नाव धारण करू लागली होती. तिच्या आठवणी धुसर होऊ लागल्या होत्या. तिला पाहताच पोलिस पथकाचा जीव भांड्यात पडला.
पोलिस आरोपीच्या मागावर
ती रेल्वे रुळांजवळ रडत उभी होती. अनवाणी, घाबरलेली. बेवारस अवस्थेत ती एका महिलेच्या दृष्टीस पडली. तिने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला आश्रमात ठेवले. मुलगी सापडली. मात्र, आईच्या कुशीतून तिला उचलून नेणारा अपहरण करणारा आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा माग काढत आहेत.
लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली
पोलिसांनी आदितीच्या आईला व्हिडीओ कॉल केला. आदितीला पाहताच तिची आई नि:शब्द झाली आणि कोसळली, तर वडिलांनी आदिती, आदिती माझं बाळ अशी हाक मारली आणि त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. बालदिनी, १४ नोव्हेंबरला पोलिसांनी आदितीला तिच्या आईच्या कुशीत परत आणून दिले.