मुंबई: वाहनाचा फोटो काढला म्हणून पोलिसाला भररस्त्यात मारहाण
By मनीषा म्हात्रे | Updated: September 13, 2022 18:44 IST2022-09-13T18:43:19+5:302022-09-13T18:44:07+5:30
मानखुर्द पोलिसांनी मारहाण करणाऱ्या शमशेर आलम याला केली अटक

मुंबई: वाहनाचा फोटो काढला म्हणून पोलिसाला भररस्त्यात मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करत असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शमशेर आलम जान आलम (३५) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पोलीस शिपाई दिनकर हरिदास जायभाय (३५) जखमी झाले आहेत. ते मानखुर्द वाहतूक विभागात कार्यरत आहे. ११ तारखेला दिनकर हे वाहतूक नियमानाचे कर्तव्य बजावत असताना शमशेरने वाहनाचा फोटो काढल्याच्या रागात शिवीगाळ सुरू केली. तोंडावर फाईट मारून खाली पाडले. त्यानंतर, त्यांची शर्टची कॉलर पकडून "मेरे को जानता नही क्या... वापस ईधर दिखेगा तो काट डालुंगा..", असे बोलून त्यांचे छातीत बुक्का मारला. घटनेची वर्दी लागताच अन्य अंमलदार तेथे आले. त्यांना पाहून शमशेरने पळ काढला. जमलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली आहे. शमशेर हा मानखुर्दचा रहिवासी आहे.