मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची अडचण वाढली, खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:32 PM2021-07-22T12:32:32+5:302021-07-22T12:33:23+5:30

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mumbai An FIR about extortion has been registered against former police commissioner parambir singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची अडचण वाढली, खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची अडचण वाढली, खंडणीचा गुन्हा दाखल

Next

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुली टार्गेटच्या आरोपांमुळे देशमुखांमागे ईडीचा ससेमिरा लागला असला तरी, हे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहदेखील चांगलेच अडकले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवरून राज्य शासनाने त्यांच्या खुल्या चौकशीची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली असतानाच मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (b), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक करण्यात आली आहे.

ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल -
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर सिंह यांच्या विरोधातही गैरकारभार आणि भ्रष्टाचारांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले. अकोला पोलीस दलातील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर  यांनी पदाचा गैरवापर करत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. तसेच आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या नावे हजारो कोटींची माया गोळा केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. घाडगे यांच्या तक्रारीसोबतच मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

क्रिकेट बुकी सोनू जालानची तक्रार -
क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंह यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांवर आपल्याला खोट्या गुन्ह्यात अटक करून मकोका गुन्हा लावून 3 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केल्याची तक्रार केली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंह यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यापाठोपाठ आता मरीन ड्राइव्ह पोलिसांकड़ून तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Mumbai An FIR about extortion has been registered against former police commissioner parambir singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app