वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या; शरीराचे ३५ तुकडे केले, दररोज एक एक तुकडा जंगलात टाकायचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:11 IST2022-11-14T14:09:37+5:302022-11-14T14:11:40+5:30
वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या; शरीराचे ३५ तुकडे केले, दररोज एक एक तुकडा जंगलात टाकायचा!
नालासोपारा (मंगेश कराळे)
वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माणिकपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांमुळे तब्बल ५ महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला आहे. दिल्ली पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
वसईच्या विजय विहार काँप्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) आणि त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते व दोघांनी कॉल सेंटरमध्ये कामाला सुरुवात केली होती. ४ ते ५ दिवसानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण सुरू झाली होती.
आफताब याने १८ मे ला श्रद्धा हिचा गळा आवळून हत्या केली व नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकरून ते मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही.
आफताब याला माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी व तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.