बिहारची राजधानी पटना शहरात एका होमगार्डवर एका व्यक्तीच्या पत्नीला पळवून नेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या पतीने आरोपी होमगार्डविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पत्नी पोलीस ठाण्यातील जवानांसाठी जेवण बनवण्याचे काम करत होती. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी होमगार्ड सतत त्यांच्या घरी येत होता आणि त्यानंतर महिला अचानक गायब झाली.
पटनाच्या बाईपास पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून तैनात असलेला सोनू कुमार नावाचा होमगार्ड, पोलीस ठाण्यात जेवण बनवण्यासाठी येणाऱ्या एका महिलेला घेऊन पळून गेला आहे. महिलेच्या पतीने आरोपी होमगार्डविरोधात बाईपास पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल केला आहे. पतीने सांगितले की, "मी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे माझी पत्नी गेल्या सात वर्षांपासून बाईपास पोलीस ठाण्यात जवानांसाठी जेवण बनवण्याचे काम करत होती."
तीन मुलांची आई होमगार्डसोबत पळाली!या कामामुळे त्यांना काही पैसे मिळत होते, ज्यामुळे उदरनिर्वाह करणे सोपे झाले होते. पतीने सांगितले की, त्यांना दोन मुली आणि एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बाईपास पोलीस ठाण्यात होमगार्ड सोनू कुमारची ड्युटी होती. तेव्हापासून तो दररोज पत्नीला भेटायला घरी येत असे. कधीकधी तो सोबत काही गरजेच्या वस्तूही घेऊन येत असे. "एकदा जेव्हा मी सोनूच्या घरी येण्याला विरोध केला, तेव्हा सोनू म्हणाला की, तुमच्या गरिबीमुळे मी मदत करत आहे," असे पतीने सांगितले.
तक्रार दाखल, पोलीस तपास सुरूदरम्यान, १३ जुलैच्या रात्री सुमारे ८ वाजता होमगार्ड सोनू तीन मुलांच्या आई असलेल्या रूपाला घेऊन पळून गेला. सोनू स्वतःही विवाहित असून, त्याला चार मुले आहेत. पत्नी पळून गेल्यामुळे पती खूप त्रस्त झाला आहे. तो आपल्या पत्नीच्या शोधासाठी सातत्याने पोलीस ठाण्याच्या वाऱ्या करत आहे. बाईपास पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार झा यांनी सांगितले की, "पीडित पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच महिलेला शोधून काढले जाईल." घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून काय सत्य काय समोर येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.