नालासोपाऱ्यात मुलगी गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:51 IST2025-02-23T06:51:17+5:302025-02-23T06:51:32+5:30
नालासोपारा पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबेला शनिवारी अटक केली आहे.

नालासोपाऱ्यात मुलगी गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघडकीस आला. हत्या करण्यास तिच्या अल्पवयीन बहिणीनेही आईला मदत केली. नालासोपारा पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबेला शनिवारी अटक केली आहे.
महाविद्यालयात शिकणारी अस्मिता दुबे (२०) ही तरुणी जय विजयनगरी या इमारतीत राहत होती. गुरुवारी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे अचानक तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिची आई ममता (४६) हिने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. मात्र तिचा चेहरा सुजलेला होता. तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याची खूण होती. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मिताचा मृत्यू गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले.
संताप अनावर; मुलीला मारहाण
मृत अस्मिता ही तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती संतापली होती. तिने मुलीला गर्भपात करण्यास सांगितले होते. मात्र तिने नकार दिला. त्यानंतर तिने मुलीला बेदम मारहाण केली. तिची १७ वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातांवर चावा घेतला, तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले.
याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तिची बहीण अल्पवयीन असून तिची १२वीची परीक्षा सुरू आहे. आई ममता दुबे हिला न्यायालयात हजर केले असता, २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अमरसिंह यांनी सांगितले.