सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:36 IST2025-11-25T13:35:07+5:302025-11-25T13:36:46+5:30
हा अपघात नसून निक्कीचा पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून थंड डोक्याने केलेला सुनियोजित खून असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
ग्रेटर नोएडा येथील सिरसा गावात काही महिन्यांपूर्वी जिवंत जळलेल्या निक्की भाटी प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी तब्बल ५०० पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली असून, हा अपघात नसून निक्कीचा पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून थंड डोक्याने केलेला सुनियोजित खून असल्याचा दावा करण्यात आला आहे. निक्कीच्या सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे आणि ब्युटी पार्लर चालवण्यामुळे संतप्त झालेल्या सासरच्या मंडळींनी तिला संपवण्याची योजना आखली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अपघात नव्हे, क्रूर षडयंत्र!
कासना कोतवाली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, निक्कीची हत्या केल्यावर तिला एक अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपींनी एक संपूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. आरोपींनी निक्कीला रुग्णालयात दाखल केले, जेणेकरून ते निक्कीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असा दिखावा करता येईल. आरोपी पतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरून पळून जाऊन, आपण घटनेच्या वेळी घराबाहेर होतो, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
सत्य फॉरेन्सिकमध्ये उघड!
निक्कीच्या सासरच्यांनी घरात एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याचा दावा केला होता. परंतु, फॉरेन्सिक तपासणीत घरात कुठेही स्फोटाचे संकेत मिळाले नाहीत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही जळाल्याने झालेल्या जखमांमुळे हायपोव्होलेमिक शॉकने निक्कीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.
आईने थिनर दिले, मुलाने आग लावली!
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खुनाची क्रूर पद्धत समोर आली आहे. निक्कीची बहीण कंचनने तक्रार दाखल केली की, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ वाजता निक्कीला खाली पाडून, तिच्यावर थिनर ओतण्यात आले आणि नंतर तिला आग लावण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पती विपिनने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याने निक्कीवर थिनर टाकले आणि आग लावली. धक्कादायक बाब म्हणजे, हे थिनर कथितरित्या त्याच्या आईनेच आणून दिले होते. विपिनने नंतर थिनरची बाटली जिथे फेकली होती, त्या ठिकाणी तपास पथकाला नेले. फॉरेन्सिक टीमने ती बाटली जप्त करून पुराव्यांमध्ये ठेवली आहे.
भाजल्यामुळे निक्कीचा दुर्दैवी मृत्यू
चार्जशीटमध्ये पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, निक्कीने रुग्णालयात मृत्यूआधी सिलेंडर स्फोट झाल्याचे जे विधान केले होते, ते दबावाखाली किंवा गोंधळात येऊन केले असण्याची शक्यता आहे. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीमुळे हा दावा खोटा ठरला आहे.
सहा वर्षांचा चिमुकला ठरला साक्षीदार
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक पुरावा म्हणजे निक्कीच्या सहा वर्षांच्या मुलाचा जबाब. मुलाने पोलिसांना सांगितले की, "मी पाहिले की पप्पांनी मम्मीला मारले आणि नंतर आग लावली." त्याने हेही सांगितले की, त्याचे वडील शेजाऱ्यांच्या छतावरून पळून गेले होते.
पोलिसांनी या प्रकरणात पती विपिन, सासू दया, सासरे सतवीर आणि जेठ रोहित यांना भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ (१) (खून), ११५ (२) (जाणूनबुजून दुखापत करणे) आणि ६१ (२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.