तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:21 IST2025-05-04T06:21:17+5:302025-05-04T06:21:33+5:30
महिलेचा पती रात्रपाळीवरून सकाळी ९ वाजता घरी परतल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघड झाली.

तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट
भिवंडी : शहरातील फेणे गाव येथे आपल्या तीन मुलींसह स्वतःही गळफास घेऊन आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. संबंधित महिलेचा पती रात्रपाळीवरून सकाळी ९ वाजता घरी परतल्यानंतर ही हृदयद्रावक घटना उघड झाली.
फेणे गाव येथील चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (३२) व मुली नंदिनी (१२), नेहा (७) व अनू (४ वर्षे) यांच्यासोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी ९ च्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेकदा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने लालजीने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हतबल लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले पत्नी व तीन मुलींचे मृतदेह आढळून आले.
आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये !
भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
आपण स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करीत असून, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी लिहिलेली चिठ्ठी खोलीत मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
महिलेने मुलींसह आत्महत्या का व कोणत्या कारणांमुळे केली हे स्पष्ट नसले तरी पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत.