पंजाबमध्ये पोलीस चौकीवर हँड ग्रेनेड फेकणाऱ्या मॉस्ट वॉन्टेडला चंद्रपुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 22:42 IST2025-01-11T22:42:07+5:302025-01-11T22:42:07+5:30
सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची माहिती मिळाली. याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने अलर्ट जारी केला होता.

पंजाबमध्ये पोलीस चौकीवर हँड ग्रेनेड फेकणाऱ्या मॉस्ट वॉन्टेडला चंद्रपुरात अटक
परिमल डोहणे
चंद्रपूर : पंजाब पोलिसांनी चंद्रपुरातून एका मोस्ट वाँटेड आरोपीला स्थानिक पोलिस व गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने अटक केली. जसप्रीत सिंग (२०) असे पंजाबमधील या मोस्ट वाँटेड आरोपीचे नाव आहे. तो अमृतसर येथील पोलिस चौकीवर हँड ग्रेनेड फेकणारा वाँटेड खलिस्तानवादी असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी अत्यंत गुप्तपणे सावधगिरीने ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
२०२३ मध्ये अमृतसर बाइक चोरी, अमली पदार्थांची विक्री यासह विविध अवैध धंद्यात सक्रिय असलेला जसप्रीत सिंग हा फरार होता. तेव्हापासून पंजाब पोलिस त्याच्या मागावर होते. यापूर्वी तो मेघालय राज्यात गेला असल्याची माहिती होती. त्याच्या मोबाइल फोनवरून गुप्तचर यंत्रणा त्याचा ठावठिकाणा घेत होती. अशातच सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची माहिती मिळाली. याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने अलर्ट जारी केला होता. यादरम्यान जसप्रीत सिंग हा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे आला. येथील लॉयड मेटल या कंपनीने काम सुरू होते. या परिसरात जसप्रीत अन्य ओळखीच्या व्यक्तीसोबत राहत होता. याबाबतची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. त्यांनी स्थानिक पोलिस व गुप्तचर विभागाच्या मदतीने त्याला अटक करण्यात यश मिळविले. २०२३ मध्ये अमृतसर येथील पोलिस चौकीवर हल्ला प्रकरणाचा मास्तर माइंड जसप्रीत सिंग होता. त्याने पोलिस ठाण्यावर हँड ग्रेनेड फेकले होते, असेही बोलले जात आहे.
सुपर मार्केटमध्ये ओळख पटली
जसप्रीत सिंगचे फोटो आधीच जारी करण्यात आले होते. याच नावाने तो घुग्गुस येथे राहत होता. गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर निगराणी ठेवून होती, मात्र हा तोच आरोपी आहे का, याची शहानिशा होत नव्हती. गुरुवारी जसप्रीत हा येथील स्थानिक सुपर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आला होता. तेव्हा हा तोच आरोपी असल्याची पुष्टी झाली आणि यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पंजाब पोलिस तेथील एका गुन्हेगाराच्या शोधात चंद्रपुरात आले. त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे दाखवून आमच्या चमूची मदत मागून संयुक्तरीत्या पंजाबमधील आरोपीला अटक करण्यात आली. परंतु, तो कोणत्या प्रकरणातील आरोपी आहे, याबाबत आपणाला कोणतीही कल्पना त्यांनी दिली नाही. -मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर