मोस्ट वॉन्टेड अन्वरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:43 PM2019-11-19T14:43:43+5:302019-11-19T14:45:38+5:30

गोवा पोलिसांची धाडसी कामगिरी : तब्बल 26 गुन्हेगारी कृत्यात समावेश

MOST WANTED CRIMINAL ANWAR ARRESTED IN KARNATAKA BY GOA POLICE | मोस्ट वॉन्टेड अन्वरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोस्ट वॉन्टेड अन्वरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देमोस्ट वॉन्टेड अन्वर शेख उर्फ टायगर या गुंडाला मंगळवारी पहाटे शेवटी सौंदत्ती—कर्नाटक येथील हॉटेलात अटक करण्यात आली. या प्रकरणात अन्वरच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच  अटक करण्यात आली होती.

मडगाव - कोयता घेऊन खुलेआम फिरत लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड अन्वर शेख उर्फ टायगर या गुंडाला मंगळवारी पहाटे शेवटी सौंदत्ती-कर्नाटक येथील हॉटेलात अटक करण्यात आली. सदर गुंडावर केपे येथील एका युवतीचे अपहरण करुन तिला धारवाड येथे कोंडून ठेवून तिचे तीन महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात अन्वरच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच  अटक करण्यात आली होती.

ही धाडसी कामगिरी केपेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई व फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक व त्यांच्या टीमने केली. आरोपी अन्वर धारवाडला लपून राहिला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सोमवारी गोवा पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना झाले होते. धारवाडला पोहोचल्यावर पोलिसांना अन्वरने धारवाड सोडल्याची माहिती मिळाली. बहुतेककरुन तो सौंदत्तीला असण्याची शक्यता यावेळी काहीजणांनी व्यक्त केली. सौंदत्तीला जाऊन गोवा पोलिसांनी कसून तपासणी केली असता, अन्वरने एका हॉटेलात आसरा घेतल्याचे त्यांना समजले. पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर अन्वरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला जेरबंद केले. पहाटे 4.30 च्या सुमारास हा सगळा सिनेमेटीक ड्रामा घडला.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, अन्वरवर आतार्पयत खुनी हल्ले, अपहरण, मारहाण,खंडणी वसुल करणो अशा अनेक प्रकारात 26 गुन्हे नोंद झाले असून सध्या सहा प्रकरणात तो वॉन्टेड होता. यात केपे येथील युवकाचे अपहरण करुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी करण्याच्या प्रकरणाचाही समावेश आहे.

सध्या केपे पोलिसात नोंद झालेल्या प्रकरणात अन्वरने केपेतील एका युवतीचे अपहरण करुन तिला आपल्या गाडीत घालून धारवाडला नेऊन ठेवले होते. धारवाड येथे अन्वर तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्या युवतीवर बलात्कार केले होते. तिथे त्या युवतीचा छळही करण्यात आला होता. या सर्व छळाला कंटाळून ती युवती अन्वरचा डोळा चुकवून धारवाडहून पळून पुन्हा गोव्यात आली होती. त्यानंतर कुडचडेच्या काही लोकांच्या मदतीने तिने केपे पोलिसात तक्रार नोंद केली होती. पोलिसांनी यापूर्वी अन्वरचे साथीदार शिवदत्त तलवार, तुळशीदास नाईक व राजेंद्र देवर या तिघांना अपहरण करणो व बलात्काराच्या गुन्हय़ाखाली अटक केली होती. या त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर पोलिसांना अन्वरचा माग लागला होता.

25 हजाराचे बक्षीस
अन्वर शेख हा अत्यंत धोकादायक असा गुंड असून गोवा पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला कर्नाटकात जाऊन जेरबंद करण्याची कामगिरी केल्याने पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी या संपूर्ण पथकाला 25 हजाराचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. याआधी एका वर्षापूर्वी फातोडर्य़ाचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्याकडे मडगावचा ताबा असताना कपीलने अन्वरला भर बाजारात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अन्वरने कर्नाटकात आसरा घेतला होता. अन्वर गोव्यात येऊन गुंडगिरी करायचा व लगेच कर्नाटकात पळून जायचा. मात्र केपेतील त्या युवतीने पोलिसांना अन्वरच्या अन्य साथीदारांची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्या युवतीमुळेच अन्वरचाही ठावठिकाणा पोलिसांना कळून चुकला. सध्या अन्वरच्या विरोधात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तडीपारी संदर्भातील प्रक्रिया चालू असल्याची माहिती गावस यांनी दिली.

‘लोकमत’ इफेक्ट
गुंड अन्वरच्या दहशतीमुळे त्याच्या या अपहरण प्रकरणाचे वार्ताकन करण्यास प्रसिद्धी माध्यमे काहीशी कचरत असताना रविवार 17 नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने अन्वरच्या या काळ्या कारनाम्यांचे सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरत अवघ्या 48 तासात अन्वरला अटक करण्यात आली. कर्नाटकात जाऊन धाडसीरित्या अटक केल्याबद्दल बायलांचो एकवोट या संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी पोलिसांचे अभिनंदन करण्याबरोबरच ‘लोकमत’ने हे धाडस दाखविल्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटू शकली असे मत व्यक्त केले. सुरुवातीला ती युवती अन्वरच्या दहशतीमुळे पोलीस तक्रार करण्यास घाबरत होती. त्यावेळी स्वत: आवदा व्हिएगस यांनी त्या युवतीला धीर देत तिला तक्रार करण्यास प्रवृत्त केले होते. अन्वरचा अशाप्रकारच्या आणखी काही प्रक़रणात हात असण्याची शक्यता व्हिएगस यांनी व्यक्त केली असून  त्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Web Title: MOST WANTED CRIMINAL ANWAR ARRESTED IN KARNATAKA BY GOA POLICE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.