UP Crime: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात बुरखा घातलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी २४ तासांच्या आत पकडलं आहे. पोलिसांनी चकमकीनंतर त्याला अटक केली. आरोपी तरुणाने भररस्त्यात महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिचा विनयभंग केला होता. या घटनेचा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये आरोपीला अटक केली.
अटक केलेल्या तरुणाचे नाव आदिल सैफी आहे. त्याच्या पायात गोळी लागली आहे. आदिल हा एका खाजगी रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. अटक झाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो रुग्णालयाच्या बेडवर कान धरून माफी मागताना दिसत आहे. 'मला माफ करा, मी पुन्हा अशी चूक करणार नाही,' असं त्याने म्हटलं.
मुरादाबाद जिल्ह्यातील नागफणी पोलीस ठाण्याच्या परिसरातील उपगंज येथील एक लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एका तरुणाने बुरखा घातलेल्या महिलेला जबरदस्तीने धरून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे दिसत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने विरोध केला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. या घटनेनंतर आरोपी फरार होता आणि काहीतरी अनुचित घडण्याच्या शोधात होता असे सांगण्यात येत आहे.
आदिल दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची पोलिसांशी चकमक झाली. यादरम्यान पोलिसांची गोळी त्याच्या पायाला लागली, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री १२ वाजता तपासणी सुरू असताना आरोपी दुचाकीवरून आला. त्याला थांबायला सांगितले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि पळून जाऊ लागला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोळी त्याच्या पायाला लागली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी आदिलकडून नंबर प्लेट नसलेली दुचाकी, एक बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी सांगितले कीआरोपी केवळ विनयभंगातच सहभागी नव्हता तर त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे देखील होती. पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.