नवी दिल्ली : ५५० पेक्षा जास्त शेल कंपन्यांमार्फत एक लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त संशयास्पद व्यवहारांशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात कुख्यात हवाला डीलर नरेश जैन यास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.ईडीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, जैन यास मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे. हे हवालावर आधारित सर्वांत मोठे मनी लॉण्ड्रिंग रॅकेट आहे. ५५४ शेल कंपन्या आणि ९४० बँक खाती त्यासाठी वापरली जात होती. प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करणाऱ्या या कंपन्यांच्या नावावर अब्जावधी रुपयांचे व्यवहार दाखविले जात होते. आर्थिक व्यवहारांचा मूळ स्रोत समजू नये, यासाठी पैसा कंपन्यांच्या खात्यांवरून सातत्याने फिरवत ठेवला जात होता. काही बड्या कंपन्या आणि एक मोठी विदेशी चलन व्यवहार कंपनीही याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहे.सूत्रांनी सांगितले की, नरेश जैन आणि त्याच्या साथीदारांची दोन प्रकरणांत चौकशी केली जात आहे. त्यातील एक प्रकरण २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरशी, तर दुसरे २००९ मधील अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोने दाखल केलेल्या फौजदारी खटल्याशी संबंधित आहे. अमलीपदार्थ प्रकरणात जैन यास २००९ मध्ये अटकही झाली होती. आता त्याला आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी अटक झाली आहे.ईडीने दिल्लीमध्ये टाकले छापेयाप्रकरणी ईडीने दिल्लीतील रोहिणी आणि विकासपुरी येथील जैन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे मारले. विदेशी खाते चालविण्यासाठीच्या १४ डिजिटल चाव्या यात सापडल्या. दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूर येथील ३३७ विदेशी बँक खात्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.
मनी लॉण्ड्रिंग : शेल कंपन्यांमार्फत १ लाख कोटींचे व्यवहार, हवाला डीलर नरेश जैन यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:34 IST