सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 18:24 IST2019-07-10T18:21:58+5:302019-07-10T18:24:54+5:30
या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले

सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक
मुंबई - गुजरात राज्यातील सुरत येथे मोबाईल दुकानाचे टाळे तोडून मोबाईल व रोकड पळवणाऱ्या टोळीतील चोरट्याला कांदिवली परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ ने बेड्या ठोकण्यात आल्या. या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी सुरतमधील स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मूळचे नवी दिल्लीत राहणारे चोरटे कॅटरिंगमध्ये वाढप्याचे काम करतात. ही टोळी जेथे जाईल तेथे दुकानांवर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी डल्ला मारत होती. अशा प्रकारे या टोळीने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बंद दुकानाचे शटर उचकटून २० मोबाईल व रोकड पळवली. या प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून सुरत (राज्य गुजरात) येथील लिंबायत पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या टोळीतील एक चोरटा मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानक येथे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ११ च्या पथकाला प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे आज पोलीस पथकाने सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार तेथे एक इसम आला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव शिवा ऊर्फ संतोष रामदास गौतम (२४) असे सांगितले.शिवाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपयांचे ४ मोबाईल आढळून आले.हे मोबाईल सुरत येथे चोरल्याची माहिती चौकशीदरम्यान शिवा याने दिली.
या चोरट्याला गुन्हे शाखा कक्ष १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय शास्त्री, गुन्हे शाखा कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन उतेकर, अंमलदार अविनाश शिंदे, सुधीर कोरगावकर, विनायक साळुंखे, रवींद्र भांबिड, सत्यनारायण नाईक, नितीन शिंदे, दीपक कांबळे, राजू गारे, संतोष माने, राकेश लोटणकर, महादेव नावगे, सचिन कदम, अजित चव्हाण, महिला अंमलदार रिया आनेराव आदी पथकाने अटक करण्यात उत्तम कामगिरी केली.