बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ‘मिसिंग मिस्ट्री’; रक्ताने माखलेली कार नवी मुंबईतून केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 09:13 IST2018-09-08T03:23:52+5:302018-09-08T09:13:53+5:30
कमला मिलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेतील प्रशासकीय अधिकारी अचानक गायब झाला. त्यांचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी नवी मुंबईत त्यांची कार रक्ताने माखलेली आढळल्याने खळबळ उडाली.

बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची ‘मिसिंग मिस्ट्री’; रक्ताने माखलेली कार नवी मुंबईतून केली जप्त
- मनीषा म्हात्रे
मुंबई : कमला मिलमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेतील प्रशासकीय अधिकारी अचानक गायब झाला. त्यांचा शोध सुरू असतानाच, शुक्रवारी (७ सप्टेंबर) नवी मुंबईत त्यांची कार रक्ताने माखलेली आढळल्याने खळबळ उडाली. या मिसिंग मिस्ट्रीचा उलगडा करण्यासाठी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात स्वत: हे प्रकरण हाताळत आहेत.
मलबार हिल परिसरात सिद्धार्थ संघवी (३७) हे पत्नी, ९ वर्षांचा मुलगा आणि आईवडिलांसह राहतात. ते लोअर परळच्या कमला मिलमधील एचडीएफसी बँकेच्या शाखेत प्रशासकीय अधिकारी आहेत. सकाळी १० ते रात्री ८ ही त्यांची कामाची वेळ आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारने ते कामाला आले. कामकाज उरकून सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान ते निघाले. या वेळी तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना कारमधून बाहेर जाताना पाहिले होते. तेथूनच पुढे ते नॉट रिचेबल झाले.
रात्री उशिर झाला म्हणून कुटुंबीयांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे चौकशी केली. रात्रभर वाट पाहिली. मात्र, काहीच पत्ता न लागल्याने गुरुवारी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, शुक्रवारी त्यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात रक्ताने माखलेली आढळली. पोलिसांचे एक पथक नवी मुंबईला रवाना झाले. त्यांनी कार ताब्यात घेत, त्रात्री उशिरा ती मुंबईत आणली. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाताच तपास सुरू केला. शुक्रवारी सकाळपासून हे अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. गुन्हे शाखा कक्ष ३ ही या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. संघवी यांचे वार्षिक उत्पन्न ४५ ते ५० लाख होते. त्यामुळे या मिसिंग मिस्ट्रीमागे आर्थिक वाद आहे का? या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे. त्यांच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल सीडीआरद्वारे शोध
संघवी यांचा मोबाइल सीडीआर काढण्यात येत आहे. त्यांच्या शेवटच्या लोकेशनवरून तपास सुरू आहे. काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
तपास सुरू : संघवी यांची कार नवी मुंबईतून जप्त केली याला अपर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दुजोरा दिला. वरिष्ठ प्रकरणाचा तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.