लिव्ह इन रिलेशनशिपमधून अल्पवयीन बनली कुमारी माता, वरूड तालुक्यातील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: December 4, 2022 15:51 IST2022-12-04T15:50:56+5:302022-12-04T15:51:23+5:30
यातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून, गतवर्षी ती मजुरीसाठी वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करत असताना तिची ओळख आरोपी रितेश याच्याशी झाली.

लिव्ह इन रिलेशनशिपमधून अल्पवयीन बनली कुमारी माता, वरूड तालुक्यातील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
अमरावती - ‘लिव्ह इन रिलेशनशिपमधून एक अल्पवयीन मुलगी कुमारिका माता बनल्याची धक्कादायक घटना वरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास आरोपी रितेश जगुशी सिरसम (२०, रा. ग्राम कोठिया बोरदई, ता. बैतूल, मध्यप्रदेश) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरूड तालुक्यातील एका शिवारात ही घटना घडली आहे.
यातील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असून, गतवर्षी ती मजुरीसाठी वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करत असताना तिची ओळख आरोपी रितेश याच्याशी झाली. काही दिवसांनी ते शेतातील एका झोपडीमध्ये एकत्र राहू लागले. त्यादरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. मार्च २०२२ मध्ये ती तिच्या घरी बैतुल जिल्ह्यात परत गेली. त्यावेळी तिने इकडे वरूड शिवारात घडलेली घटना कुटुंबियांपासून दडवून ठेवली. तर दुसरीकडे तिला प्रसववेदना सुरू झाल्याने तिच्या कुटूंबियाने तिला मध्यप्रदेशातील एका रूग्णालयात दाखल केले.
तेथे तिने मुलीला जन्म दिला. तत्पुर्वी, संबंधित रूग्णालय प्रशासनाने मुलीच्या कागदपत्रांची तपासणी केली. ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याबाबत बैतुल जिल्ह्यातील आमला पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तेथे जाऊन पिडितेचा जबाब नोंदवला. त्यावेळी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना तिला गर्भधारणा झाल्याची बाब उघड झाली.
म्हणून गुन्हा वर्ग -
बैतुल जिल्ह्यातील आमला पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद केली. मात्र, घटनास्थळ हे वरूड तालुक्यातील असल्याने तो गुन्हा तपासासाठी वरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ती केसडायरी प्राप्त होताच, वरूड पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी बैतुल जिल्ह्यातील आमला पोलीस ठाणे व पिडिताच्या घरी पोलीस पथक जाईल, अशी माहिती वरूड ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक बागडे यांनी दिली.