Video : #MeToo : शिवडी टीबी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार;नर्सने केला डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
By पूनम अपराज | Updated: November 19, 2018 18:20 IST2018-11-19T18:19:05+5:302018-11-19T18:20:00+5:30
याबाबत लेखी तक्रार पीडित नर्सने राज्य महिला आयोगाकडे आणि आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Video : #MeToo : शिवडी टीबी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार;नर्सने केला डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप
मुंबई - जगभरात सुरू असलेल्या MeTooच्या वादळामुळे शिवडीतील टीबी रुग्णालयात घडलेली धक्कादायक घटना आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. पीडित महिलेसोबत ही घटना १० ऑगस्ट २०१८ ला घडली होती. त्यानंतर होणारी बदनामी आणि संसारात निर्माण होणार कलह लक्षात घेऊन पीडित नर्सने आवाज उठवला नव्हता. मात्र, संपूर्ण देशभरात MeTooचे वादळ उठल्यानंतर हिंमत करून नवऱ्याच्या मदतीने पीडित नर्सने पुढे येऊन अन्यायाला आवाज उठविण्याचे ठरविले. त्यानंतर पीडित नर्सने पोलीस उपायुक्त अंबिका, आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला.
शिवडीच्या टीबी रुग्णालयात सध्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अमर पवार याच्याविरोधात पीडित नर्सने लेखी तक्रार दाखल केली आहे. ही लेखी तक्रार पीडित महिलेने आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे दिली आहे. या पीडित महिलेने MeTooमुळे मला पुढे येऊन तक्रार करण्याचे धारिष्ट आले असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
लेखी तक्रारीत पीडित महिलेने सांगितले की, ''२ ऑगस्ट रोजी एका बालरुग्णाच्या वाढदिवसादिवशी रात्री १०. ३० वाजताच्या सुमारास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला असता डॉ. अमर पवार याने माझा हात पकडला. त्यानंतर मी या डॉक्टरला कडक शब्दांत बजावले.'' हा प्रकार घडला तेव्हा पीडित नर्स रात्रपाळीला होती. त्यानंतर देखील परिस्थिती बदलली नव्हती. पुन्हा डॉ. अमर पवारने पीडित नर्सच्या खांद्याला मागे ओडून वाईट स्पर्श केला, असे या नर्सने तक्रार अर्जात नमूद केले आहे.
याप्रकरणी लोकमतने शिवडी टीबी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ललित आनंदे यांना विचारले असता, डॉ. अमर पवार हे अतिशय कर्तव्यदक्ष डॉक्टर असून, रुग्णालयातील भांडणाचे पर्यावसान हे या विनयभंगाच्या पोलीस तक्रारीत होत असल्याचे म्हणाले. तसेच पोलिसात ही तक्रार गेलीच आहे तर पोलीस याबाबत चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील असे आनंदे पुढे म्हणाले.