प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:11 IST2025-10-08T14:11:05+5:302025-10-08T14:11:07+5:30
वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांची आठ पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यात त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी, अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) पदावर कार्यरत असलेल्या वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने हरियाणा पोलिस आणि प्रशासनिक यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. 2001 बॅचचे अधिकारी असलेल्या पूरन कुमार यांनी चंदीगडमधील खासगी निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, घटनास्थळावर 8 पानी सुसाइड नोट मिळाली असून, त्यात त्यांनी संपूर्ण मालमत्ता पत्नीच्या नावावर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या सेवेतील जातीय भेदभाव, अन्याय आणि मानसिक त्रासाचा सविस्तर उल्लेख केला आहे.
पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले की, 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांनी त्यांना सातत्याने मानसिक आणि प्रशासकीय दबावाखाली ठेवले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये माजी DGP हरियाणा यांच्यावर सर्वाधिक गंभीर आरोप केले आहेत. नोटमध्ये पूरन कुमार यांनी स्पष्टपणे नमूद केले की, त्यांच्याशी जातिवरुन भेदभाव करण्यात आला, पोस्टिंग आणि प्रमोशनमध्ये अन्याय, ACR (Annual Confidential Report) मध्ये फेरफार, सरकारी निवास नाकारला जाणे आणि त्यांच्या प्रशासकीय तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. या आरोपांसह “आता लढण्याची ताकद उरलेली नाही” असेही त्यांनी यात नमूद केले.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ADGP पूरन कुमार यांनी चंदीगडमधील खासगी निवासस्थानाच्या बेसमेंटमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. ही घटना घडली, तेव्हा घरात त्यांची मुलगी एकटीच होती. गोळीचा आवाज ऐकताच मुलगी बेसमेंटमध्ये गेली आणि वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून किंचाळत बाहेर आली. आवाज ऐकून शेजारी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
चंदीगडचे IGP आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक तपास केला. संपूर्ण ठिकाणाचे व्हिडिओ आणि फोटो डॉक्युमेंटेशन करण्यात आले असून, कुटुंबीय आणि घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या हरियाणा कॅडरच्या IAS अधिकारी असून, विदेश सहयोग विभागाच्या सचिव व आयुक्त आहेत. घटनेवेळी त्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर होत्या.
पूरन कुमार कोण होते?
वाय. पूरन कुमार हे हरियाणा कॅडरचे 2001 बॅचचे IPS अधिकारी होते. ते कठोर, प्रामाणिक आणि निर्भय अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी आपल्या करिअरमध्ये IGP (रोहतक रेंज), IGP (कायदा आणि सुव्यवस्था), IG (दूरसंचार विभाग), IG पोलिस ट्रेनिंग सेंटर (PTC) या पदांवर काम केले. अलिकडेच सरकारने त्यांना रोहतक रेंजवरुन PTC सुनारिया येथे ट्रान्सफर केले होते. विभागीय वर्तुळात या बदलीला “पनिशमेंट पोस्टिंग” मानले जाते.
संघर्ष आणि वादांनी भरलेली कारकीर्द
पूरन कुमार हे प्रशासकीय भेदभाव, जातीय विषमता आणि मनमानी आदेशांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे अधिकारी होते. 2020 मध्ये, तत्कालीन DGP मनोज यादव यांच्यावर त्यांनी वैयक्तिक वैर आणि जातीय भेदभावाचा आरोप केला होता. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव अरोरा यांच्यावरही पक्षपाती चौकशीचा आरोप केला होता. त्यांनी हरियाणा हायकोर्टात अनेक याचिका दाखल केल्या, विशेषतः पोस्टिंग, निवास वाटप आणि पद निर्मितीसंदर्भात. त्यांनी वित्त विभागाच्या मंजुरीशिवाय पदनिर्मिती आदेश जारी केल्याबद्दल सरकारच्या निर्णयालाही न्यायालयात आव्हान दिले होते.