सौरभची हत्या नसून 'वध' केलाय, आरोपी साहिलचा दावा; मर्डरचं तंत्र-मंत्र कनेक्शन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:46 IST2025-03-20T16:45:22+5:302025-03-20T16:46:08+5:30
ही मानसिक प्रवृत्ती अत्यंत धोकादायक असते. अशा व्यक्तींना कुठल्याही गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

सौरभची हत्या नसून 'वध' केलाय, आरोपी साहिलचा दावा; मर्डरचं तंत्र-मंत्र कनेक्शन काय?
लखनौ - मेरठ हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटमध्ये टाकून दिले. या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशीत धक्कादायक सत्य उघडकीस येत आहे. ही हत्या नसून वध असल्याचा दावा आरोपीने करून गुन्ह्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न होत आहे. जेव्हा एखादा गुन्हेगार गुन्ह्याचा हेतू नैतिक आणि धार्मिक सांगून ते योग्य असल्याचं सांगतो हे पहिल्यांदाच घडत नाही. ही मानसिक प्रवृत्ती फार जुनी आहे.
गुन्हेगारी इतिहासात बऱ्याचदा काही गुन्हेगार स्वत: केलेले कृत्य योग्य ठरवण्यासाठी असा प्रयत्न करत असतात. पोलिसांनी सांगितले की, सौरभच्या हत्येतील आरोपी साहिल शुक्ला आणि मुस्कान सोबत नशा करत होते. इतकेच नाही साहिलचा तंत्र मंत्रावर विश्वास असायचा. तो त्याच्या मृत आईशी बोलायचा आणि ती त्याला आदेश करायची असंही त्याने जबाबात दावा केला. आरोपीची मानसिकता पाहिली तर तो समाजात काही तरी बदल घडवण्यासाठी गुन्हा घडवून आणतोय असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
ही मानसिक प्रवृत्ती अत्यंत धोकादायक असते. अशा व्यक्तींना कुठल्याही गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही. याबाबत सायकोलॉजिस्ट डॉ. अनुजा कपूर सांगतात की, तंत्र-मंत्र या दोन वेगळ्या विधी आहे. परंतु तंत्र-मंत्राच्या नावाखाली गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केले जाते. तंत्र मंत्र हा विधी असला तरी कुणाचाही वध करण्याची परवानगी देत नाही. गुन्हेगार स्वत: गुन्हा करतो आणि त्याने केलेले कृत्य योग्य ठरवण्यासाठी तंत्र-मंत्राला मानसिक प्रवृत्तीशी जोडतो असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, जेव्हा एखादा व्यक्ती अंधविश्वासाला सामाजिक जबाबदारीपेक्षा जास्त मानतो तेव्हा तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होतो. ही विकृत मानसिकता आहे. जिथे आपल्या इच्छेला तर्कहिन पद्धतीने गुन्ह्याशी जोडले जाते. याआधीही असे बरेच गुन्हे समोर आलेत. २००६ साली सुरिंदर कोहली याने मुलांची हत्या करून त्यांना खाल्लं होते, त्याने तंत्र मत्राचा हवाला देत त्याचे कृत्य बरोबर असल्याचा दावा केला होता. १९८० साली एक सिरियल किलर रस्त्यावर झोपणाऱ्यांची हत्या करायचा. तो स्वत:ला समाज सुधारक असल्याचं भासवत लोकांची हत्या करत होता. २०१७ साली एका व्यक्तीने त्याच्या आई बहिणीची हत्या केली होती. काली मातेने मला आदेश दिले होते असा दावा त्या आरोपीने केला होता.