मी ‘दादा’ आहे म्हणत दमदाटी, खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी; गुंडावर गुन्हा दाखल
By संजय पाटील | Updated: February 26, 2024 21:14 IST2024-02-26T21:09:45+5:302024-02-26T21:14:40+5:30
मयूर मार्क फर्नांडिस असे गुंडाचे नाव, कऱ्हाडातील प्रकार

मी ‘दादा’ आहे म्हणत दमदाटी, खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी; गुंडावर गुन्हा दाखल
संजय पाटील, कऱ्हाड: खंडणीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुंडावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय तुकाराम खडतरे (रा. गाय मंदिराजवळ, कार्वेनाका, कऱ्हाड) या युवकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर मार्क फर्नांडिस (रा. दत्त बकुळा कॉलनी, गाय मंदिराजवळ, कार्वे नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वेनाका येथील विजय खडतरे हा युवक गवंडी काम करतो.
दोन दिवसांपूर्वी तो कार्वेनाका येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी केला होता. त्यावेळी मयूर फर्नांडिस हा त्याच्या मित्रांसह त्याठिकाणी आला होता. जेवण सुरू असताना त्याचा मित्रांसोबत वाद झाला. हा वाद सुरू असतानाच विजय तेथून घरी निघून गेला.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मयूर फर्नांडिस हा विजयच्या घराजवळ आला. त्याने त्याच्या घराच्या दरवाजावर लाथा मारल्या. त्यामुळे विजयने दार उघडले असता मयूरने त्याला शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने मारहाण केली. तुला मस्ती आली आहे. मी कऱ्हाडचा दादा आहे. तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून त्याने विजयला खाली पाडले. त्याच्या पॅन्टच्या खिशातील अडीच हजार रुपये काढून घेतले. प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये मला द्यायचे. नाहीतर तुझ्या वडिलांचा खून करीन, असे म्हणत मयूर फर्नांडिस याने विजय खडतरे याला दमदाटी केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. याबाबत विजय खडतरे याने दिलेल्या फिर्यादीवरून कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे तपास करीत आहेत.