पिंपरी : एटीएमचोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. एटीएम मशीन चोरीसाठी त्याने चिंचवड थरमॅक्स चौकात रेकी केली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आरोपीला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेहरबानसिंग तारासिंग डांगी (वय २५, रा. ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डांगी याने त्याचे साथीदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांच्यासह चिंचवड, थरमॅक्स चौकातील एटीएम मशीन दि. ९ जून रोजी चोरून नेले होते. निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी डांगी याने या एटीएमची रेकी करून कधी चोरी करायचे हे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी एटीएम चोरून नेले. आरोपी डांगी सेंट्रल चौक येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे शोध पथक सेंट्रल चौक येथे दबा धरून थांबलेले होते. त्यावेळी आरोपी डांगी हा तेथे आला. त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो तेथून पळ काढू लागला. त्यास शोध पथकाने शिताफिने पकडून ताब्यात घेतले. आरोपी डांगी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांनी थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेले एटीएम फोडून त्यातील पैसे चोरी केले असल्याचे त्याने कबूल केले. या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आरोपी यांनी लोणीकाळभोर जवळील अवताडेवाडी येथून चोरी केली असल्याचे कबूल केले. तसेच आरोपी यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटिएम फोडून चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितीन बहिरट, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 18:48 IST
आरोपी यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरी केली असल्याबाबत दिली कबुली
एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळल्या
ठळक मुद्देथरमॅक्स चौकात केली होती रेकी : गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी