Mask's online deal became expensive | मास्कची ऑनलाईन डील महागात पडली, ८१ हजार रुपये केले लंपास

मास्कची ऑनलाईन डील महागात पडली, ८१ हजार रुपये केले लंपास

नागपूर : मास्कची आॅनलाईन डील करणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. पालघरच्या आरोपीने ५०० मास्क स्वस्त दरात देतो, अशी थाप मारून त्यांचे ८१ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.
शिरीष प्रभाकर जोग हे नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, ते मास्क तसेच वैद्यकीय साहित्याचा व्यवसाय करतात. एप्रिल महिन्यात त्यांना मोठ्या प्रमाणात मास्क खरेदी करावयाचे होते. त्यामुळे ते आॅनलाईन सर्च करीत असताना त्यांना फेसबुकवर मास्क विक्रीचा व्यवसाय करणारा आरोपी उत्तम सुरेश लोके (वाकीपाडा, नायगाव जि. पालघर) याची जाहिरात आणि पत्ता दिसला. तो लॅबवर्ड फार्म नावाने एन-९५ मास्कची ठोक विक्री करत असल्याचे कळल्यामुळे जोग यांनी आरोपी लोकेसोबत संपर्क साधला.
आरोपीने जोग यांना व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचे फोटो आणि दर पाठविले. त्यातील काही मास्क सिलेक्ट करून सौदा केल्यानंतर जोग यांनी आरोपीला ५०० मास्कची आॅर्डर दिली. आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आॅनलाईन बँकिंगद्वारे त्याच्या खात्यात ८१ हजार ३७० रुपये पाठविले. त्यानंतर मास्कची खेप मिळेल म्हणून जोग वाट पाहू लागले. मात्र दोन महिने होऊनही आरोपीने जोग यांना मास्क पाठविले नाही. संपर्क साधल्यानंतर रक्कमही परत केली नाही. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे जोग यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.

Web Title: Mask's online deal became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.