निर्मलनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 03:25 IST2019-05-10T03:25:03+5:302019-05-10T03:25:59+5:30
वांद्रे परिसरात एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यातच तिने हे पाऊल उचलले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

निर्मलनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप
मुंबई - वांद्रे परिसरात एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यातच तिने हे पाऊल उचलले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वांद्रेच्या बेहरामपाडा परिसरात नौसिन एस. ही तिचा पती आणि सासरच्यांसोबत राहत होती. मात्र लग्न झाल्यापासून घरच्यांकडून तिला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत ती तिच्या घरच्यांना सांगायची. बुधवारी रात्री नौसिनने राहत्या घरी गळफास घेतला.
याबाबत सासरच्यांनी पोलिसांना कळविले. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नौसिनचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठविला. नौसिनच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी नौसिनच्या सासरच्यांनी मागितला तेवढा हुंडा दिला होता. मात्र त्यानंतरदेखील त्यांच्याकडून मुलीला त्रास देणे सुरूच होते.
त्याच तणावात अखेर नौसिनने हे पाऊल उचलले असावे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती निर्मलनगर पोलिसांनी दिली.