उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच क्लेशदायक घटना उघडकीस आली आहे. पुतण्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर महिलेच्या पतीने तिचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. तिने कुटुंबाच्या सन्मानाला पायदळी तुडवलं आहे, असे म्हणत पतीने अंत्यसंस्कारास नकार दिल.
काय आहे नेमके प्रकरण?
पूजा मिश्रा असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी पूजाचा विवाह बाराबंकी येथील ललित मिश्रा यांच्याशी झाला होता. सुरुवातीला सर्वकाही ठीक होते, पण काही काळानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. याच दरम्यान, ललितचा पुतण्या आलोक मिश्रा बाराबंकीहून बरेलीला गेला. या काळात पूजा आणि आलोक यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, असा आरोप आहे.
भाड्याच्या घरात सुरू होती 'लिव्ह-इन'
दोन महिन्यांपूर्वी पूजा आणि आलोक यांनी बरेलीतील किला पोलीस स्टेशन परिसरात भाड्याने एक खोली घेतली आणि तिथे ते एकत्र राहू लागले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. मंगळवारी रात्रीही त्यांच्यात कशावरून तरी कडाक्याचे भांडण झाले होते.
बुधवारी सकाळी बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही, तेव्हा घरमालकाला संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला असता, पूजाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, घटनेनंतर आलोक मिश्रा हा तिथून फरार झाला होता.
पतीने मृतदेह घेण्यास दिला नकार
घटनेची माहिती मिळताच पूजाचा पती ललित मिश्रा बाराबंकीहून बरेलीत पोहोचला. पोलीस स्टेशनमध्ये त्याने गंभीर आरोप केले. ललितने सांगितले की, त्याच्या पुतण्याने पूजाला फसवले. आलोक आता तिच्याशी लग्न करण्यास नकार देत होता आणि नेहमी तिच्याशी भांडत होता, असे पूजाने त्याला फोनवर सांगितले होते. ललितने पूजाला घरी परत आणण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिने नकार दिला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी जेव्हा ललितला मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. "जी महिला कुटुंबाची बदनामी करते, मी तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही," असे ललितने पोलिसांना सांगितले. अखेरीस, कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांनी बरेलीतच पूजावर अंत्यसंस्कार केले.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
फोर्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी सुभाष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आलोक मिश्रासह त्याच्या कुटुंबातील एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलोक आणि त्याच्या कुटुंबियांनी पूजाचा मानसिक छळ केल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Web Summary : UP woman in live-in with nephew, commits suicide after disputes. Husband refuses the body, citing family dishonor, leading to police performing the last rites. Case filed against nephew and family for abetment.
Web Summary : यूपी में विवाहित महिला भतीजे संग लिव-इन में, विवादों के बाद आत्महत्या। पति ने परिवार की बदनामी बता शव लेने से इनकार किया, पुलिस ने अंतिम संस्कार किया। भतीजे और परिवार पर मामला दर्ज।