अवघ्या ५ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, तरुणानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी! व्हिडीओत म्हणाला, "सगळ्यांनी ऐका, माझी बायको.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:23 IST2025-10-22T10:21:23+5:302025-10-22T10:23:30+5:30
पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका पतीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

AI Generated Image
कर्नाटकच्या रामनगरमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका पतीने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूला कवटाळण्यापूर्वी या पतीने आपला व्हिडीओ बनवून पत्नीच्या सगळ्या करतूती जगासमोर आणल्या आहेत.
पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव रेवंत कुमार होते. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
५ महिन्यांतच सुखी संसाराचा झाला अंत!
रामनगर जिल्ह्यातील बिदादी परिसरातील ही घटना आहे. हरोहल्ली तालुक्यातील अन्नाडोड्डी गावचा रहिवासी असलेला रेवंत कुमार बिदादीतील एका कारखान्यात काम करत होता. ५ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण, लग्नानंतरच्या अल्पावधीतच त्याच्या पत्नीने त्याला इतका त्रास दिला की त्याला थेट आपले जीवन संपवावे लागले.
मरण्यापूर्वीचा व्हिडीओ आणि रेवंतचे गंभीर आरोप
मंगळवारी रेवंतने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला. यात त्याने पत्नी मल्लिका हिच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. तो आपल्या व्हिडीओत म्हणाला की, "हॅलो! सगळ्यांनी ऐका. माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त माझी पत्नीच जबाबदार असेल. कारण लग्नानंतर ती मला खूप त्रास देत आहे. आज मी मरतोय, कारण तिचा हा छळ आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. तिच्यामुळे मी प्रचंड तणावात आहे. ना मला नीट काम करता येतंय, ना मी धड जगू शकतोय."
तिलाही त्याच वेदना मिळायला हव्यात!
रेवंतने पुढे सांगितले की, पत्नी सुधारेल, अशी आशा त्याला होती; पण तिचे टॉर्चर तर दिवसागणिक वाढतच गेले. "तिचा हा छळ सहन करून मी पूर्णपणे थकून गेलो आहे. आज मी इथे आलोय, कारण मला मरायचं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ बनवत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला कठोर शिक्षा व्हावी. तिने मला जेवढं दुःख दिलं, तेवढंच दुःख तिलाही मिळावं, अशी माझी इच्छा आहे," असे म्हणत रेवंतने आपली वेदना व्यक्त केली.
व्हिडीओ बनवल्यानंतर रेवंत कुमारने समोरून येणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस रेवंतच्या पत्नीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत.