५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वेळा फाशीची शिक्षा; भोपाळच्या न्यायालयाने दिला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST2025-03-19T14:16:44+5:302025-03-19T14:17:18+5:30
नव्या बीएनएस कायद्यानुसार शिक्षा करण्यात आलेले हे पहिले असे प्रकरण आहे ज्यात दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वेळा फाशीची शिक्षा; भोपाळच्या न्यायालयाने दिला निकाल
भोपाळमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तेथील कोर्टाने तीन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आली. तसेच पुरावे नष्ट करण्यास मदत करणाऱ्या आई आणि बहिणीला दोन-दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नव्या बीएनएस कायद्यानुसार शिक्षा करण्यात आलेले हे पहिले असे प्रकरण आहे ज्यात दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय या नराधमाला २ कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि २ कलमांतर्गत ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. अतुल निहाले असे या आरोपीचे नाव आहे. २४ सप्टेंबर २०२४ ला ही घटना घडली होती. शाहजहांबादमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगासह शरीरावर चाकुचे वार करण्यात आले होते. तसेच तिचा मृतदेह लपविण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी अतुलच्या आईने आणि बहिणीने मदत केली होती. या क्रूर कृत्याची शिक्षा सहा महिन्यांच्या आत सुनावण्यात आली आहे.
विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी हा निकाल दिला आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येते. जर आपण मुलांना असा समाज देऊ शकत नाही जिथे ते स्वतःच्या अंगणात, घरात, शाळेत खेळू शकतील, तर सुसंस्कृत समाजाची कल्पना कशी करता येईल? जर मृत्युदंडापेक्षा मोठी शिक्षा असेल तर आरोपीला ती मिळायलाच हवी, असे त्यांनी म्हटले आहे. आरोपी अत्यंत क्रूर, निर्दयी, भयानक, पाशवी आहे. इतर कोणत्याही शिक्षेचा प्रश्न निःसंशयपणे संपतो, असे यावर कोर्टाने म्हटले आहे.
मुलीच्या हत्येनंतर तिचे पाय बांधण्यात आले, तिचा मृतदेह गोणीमध्ये भरून बाथरुमच्या वर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या टाकीत लपविण्यात आला होता. बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यावर पोलिसांनी मुलीला शोधले होते. आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी होता असा दावा करण्यात आला होता. गुन्ह्याच्या वेळी तो पूर्णपणे निरोगी होता आणि त्याने हा गुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने केला होता, हे सिद्ध करण्यात सरकारी वकील यशस्वी ठरले.