मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:56 IST2025-07-31T13:53:59+5:302025-07-31T13:56:52+5:30

Malegaon Verdict: तब्बल १७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देण्यात आला

Malegaon bomb blast case verdict All seven accused acquitted who was accused and for what | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?

Malegaon Verdict: देशातील बहुप्रतिक्षित निकालापैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल लागला.NIAच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी आरोपी असलेल्या सर्व ७ आरोपींना प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. मालेगावमध्ये स्फोट (Malegaon Blast) झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु तपासात अनेक त्रुटी होत्या. काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड केली होती. मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे वकील सिद्ध करू शकले नाहीत. तसेच,  जखमींचे वयही चुकीचे होते. त्यामुळे सबळ पुराव्यांअभावी सर्वांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय देण्यात आला. ज्या सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यांच्यावर काय आरोप होते जाणून घ्या.


कुणावर काय आरोप?

अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा बॉम्बस्फोट घडवण्यात सहभाग होता असा दावा करण्यात आला होता.

१. प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर कटात सहभागी असल्याचा आरोप होता.

२. मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) हे पुण्याचे रहिवासी असून त्यांच्यावर बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आरोप होता.

३. समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर हे देखील पुण्याचे असून त्यांच्यावर बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य मिळवण्यास मदत केल्याचा आरोप होता.

४. अजय उर्फ राजा राहिरकर हे बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या अभिनव भारतचे पुणे येथील कोषाध्यक्ष असल्याने त्यांना आरोपी बनवण्यात आले होते.

५. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुख्य कट्टरपंथी ठरवून ते या कटाचे प्रेरक असल्याचे तसेच आरडीएक्स मिळवण्यास मदत केल्याचे आरोप होते.

६. स्वामी अमृतानंद देवतीर्थ हे मूळचे जम्मू-काश्मीरचे असून ते स्वयंघोषित शंकराचार्य आहेत असा दाव करत त्यांनी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप होता.

७. सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर हे ठाण्याचे असून त्यांच्याकडे शस्त्रे सापडली असा दावा एटीएसने केला होता तसेच त्यांच्यावरही कटात सहभागी असल्याचा आरोप होता.

स्फोटात ६ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता. २९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. १७ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल रोजी सर्व सात आरोपींविरुद्ध निकाल राखून ठेवला. निकाल जाहीर करण्याची तारीख ८ मे निश्चित करण्यात आली होती. सर्व आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली. त्यानुसार आज हा निकाल देण्यात आला.

Web Title: Malegaon bomb blast case verdict All seven accused acquitted who was accused and for what

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.