१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:48 IST2025-09-21T16:46:26+5:302025-09-21T16:48:54+5:30
इम्पीरियल ग्रुपच्या अध्यक्षांच्या जागेवर ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये ८० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघडकीस आली आहे.

१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
ED Action:अंमलबजावणी संचालनालयाने १९ आणि २० सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील सहा ठिकाणी छापे टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही ठिकाणे दिल्लीस्थित इम्पीरियल ग्रुपचे अध्यक्ष मनविंदर सिंग, त्यांची पत्नी सागरी सिंग आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची होती. ईडीची ही कारवाई फेमा कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीच्या तपासात असे दिसून आले की मनविंदर सिंग आणि त्यांच्या पत्नीने परदेशात अनेक कंपन्या आणि मालमत्तांमध्ये बेनामी गुंतवणूक केली आहे. यामध्ये सिंगापूर, दुबई, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि थायलंडमधील मालमत्ता आणि बँक खाती समाविष्ट आहेत.
ईडीच्या तपासादम्यान दोघांचेही सिंगापूरच्या एरोस्टार व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि दुबईच्या युनायटेड एरोस्पेस डीडब्ल्यूसी एलएलसीमध्ये हिस्सेदारी होती. दुबईतल्या या कंपनीच्या माध्यमातून, कोट्यवधी रुपयांचे कर्ज, पेमेंट आणि व्यवहारांचे जाळे तयार करण्यात आले होते. याच कंपनीने मे २०२५ मध्ये ७ कोटी रुपयांचे रॉबिन्सन-६६ हेलिकॉप्टर खरेदी केले होते, जे हाँगकाँगच्या एका संस्थेकडून कर्ज घेऊन मिळवण्यात आले होते. हिमाचलमधील औरमाह व्हॅली प्रकल्पासाठी भारतात पैसे आणण्यात आले होते. ३१ मार्च २०२५ पर्यंत या कंपनीकडे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचेही तपासात उघड झाले.
ईडीने शुक्रवारी पहाटे शिमला येथील नलदेहरा येथील औरमाह व्हॅली रिअल इस्टेट प्रकल्पावर सकाळी ६ वाजता छापा टाकला होता. अत्यंत गुप्तपणे हा छापा टाकण्यात आला, सुरक्षेसाठी सशस्त्र सीआरपीएफ जवान तैनात होते. ईडीचे अधिकारी पंजाब आणि दिल्ली नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांमध्ये आले आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती. पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि व्यवहारांशी संबंधित फायली तपासल्या.
३१ मार्च २०२५ पर्यंत, दुबईच्या कंपनीने अंदाजे ३८ कोटी किमतीची परदेशी मालमत्ता नोंदवली होती. थायलंडमधील कोह समुई येथे व्हिला समायरा नावाचा एक बंगला सापडला, ज्याची किंमत अंदाजे १६ कोटी आहे. ईडीच्या मते, आतापर्यंत जप्त केलेल्या कागदपत्रांवरून आणि आर्थिक नोंदींवरून असे दिसून येते की या परदेशी मालमत्ता ८० कोटी पेक्षा जास्त किमतीच्या आहेत.
दरम्यान, हिमाचलच्या औरमाह व्हॅलीमध्ये नलदेहराजवळ १०० एकर जमिनीवर १,००० फ्लॅट्स असलेला एक मेगा रिअल इस्टेट प्रकल्प बांधला जात आहे. एका प्रकरणात, ईडीला ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील प्रकल्प संचालकांच्या ३१ कोटी आणि ९ कोटी रुपयांच्या अघोषित मालमत्तेचे भक्कम पुरावे सापडले होते. प्रकल्प मालकांनी काळ्या पैशाचा वापर करून दुबई आणि थायलंडमध्ये गुप्तपणे मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले. ईडी पथक या प्रकल्पाशी संबंधित अनेक व्यक्तींकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि परकीय चलन जप्त करेल. मनी लाँड्रिंग आणि मनी ट्रेलसह जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करण्यात येणार आहे.