उत्तर प्रदेशातील महोबा येथे एका महिलेला रील बनवण्यापासून रोखल्याने तिला इतका राग आला की, तिने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. तिचा मृतदेह रेल्वे रुळावर पडलेला आढळून आला. महिलेचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
महोबा शहरातील कोतवाली भागातील जुखा भागात ही घटना घडली आहे. लाडपूर गावात राहणारा सफिक हा एका भाड्याच्या घरात राहतो आणि अंडी विकण्याचं काम करतो. अवघ्या सात महिन्यांपूर्वी त्याचं लग्न २० वर्षीय जुलेखा हिच्याशी झाला, नवविवाहित जोडपं आपलं जीवन आनंदाने जगत होते. जुलेखाला रील बनवण्याची आवड होती. पण हीच आवड आता तिच्या जीवावर बेतली आहे.
रील बनवण्यास नकार दिल्याने झाला वाद
लग्नानंतरही जुलेखाचा रील बनवण्याचा छंद सुरूच होता. ती नेहमीच रील्स बनवण्यात व्यस्त असायची, त्यामुळे तिने पतीलाही कधी वेळ दिला नाही. रील बनवणं पती-पत्नीमध्ये वादाचं कारण बनलं. शफीकने सांगितलं की, काल रात्री काम करून तो घरी परतला. तेव्हा जेवण बनवण्याऐवजी त्याची पत्नी स्वयंपाकघरात इन्स्टाग्रामवर रील बनवत होती, त्यानंतर तो चिडला आणि त्याने तिला रील बनवण्यास मनाई केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला
अचानक रात्री पत्नी घरातून निघून गेली. शफिकने तिचा शोध सुरू केला तेव्हा ती कुठेच दिसली नाही. सकाळपर्यंत तिचा काहीच पत्ता नव्हता. त्यानंतर शफिकने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता महोबा-खजुराहो रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पतीचीही चौकशी सुरू आहे.