दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 07:18 IST2025-12-15T07:16:25+5:302025-12-15T07:18:18+5:30
२०१२ मध्ये जालना शहरात घडली होती घटना

दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
नवी दिल्ली: महाराष्ट्रात २०१२ साली एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी फेटाळली २०२२ रोजी राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे.
आरोपीचे नाव रवी अशोक घुमारे, असे असून त्याने ८ मार्च २०१२ रोजी दोन वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यातर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली होती. ही घटना जालना शहरात इंदिरानगर भागात घडली होती. या घटनेनंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी घुमारे याला स्थानिक न्यायालयाने त्याच्या नृशंस कृत्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली होती. ही फाशीची शिक्षा पुढे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. यावर घुमारे याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असताना न्यायालयाने याचिका फेटाळत ३ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
कोर्टाने काय म्हटले होते?
फाशी कायम ठेवताना न्या. सूर्य कांत व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांनी निकालपत्रात घुमारे याच्या कृत्याला कोणतीही माफी नाही, असे स्पष्ट करत लैंगिक भूक शमवण्यासाठी सर्व नैसर्गिक, सामाजिक, कायदेशीर मर्यादा घुमारेने ओलांडल्याचे स्पष्ट केले होते.
घुमारेने मुलीचे फुलण्यापूर्वीच आयुष्य निष्ठुरपणे संपवले. त्या मुलीला वडीलकीचे प्रेम, आपुलकी, संरक्षण देण्याऐवजी वासनेचा बळी बनवले. है प्रकरण विश्वासघाताचे, सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचे, गलिच्छ व विकृत मनोवृत्ती दर्शवणारे क्रूर प्रकरण आहे.