Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील हेड कॉन्स्टेबलच्या घरावर, फार्म हाऊसवर छापा; 14 गाड्यांसह 4 कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:09 IST2021-11-03T14:06:33+5:302021-11-03T14:09:52+5:30
Madhya Pradesh: मंगळवारी केलेल्या या कारवाईत लोकायुक्त पथकाने 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 14 वाहने जप्त केली आहेत.

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील हेड कॉन्स्टेबलच्या घरावर, फार्म हाऊसवर छापा; 14 गाड्यांसह 4 कोटींची मालमत्ता जप्त
जबलपूर : मध्य प्रदेशातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जबलपूर लोकायुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेश पोलिसात कार्यरत हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह यांच्या घरावर आणि फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी छापा टाकला, त्यावेळी संपत्ती पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
दरम्यान, या कारवाईवेळी पथकाने कोट्यवधींची मालमत्ता आणि अनेक वाहने जप्त केली आहेत. हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह सध्या तिलवारघाट पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत. करोडपती हेड कॉन्स्टेबलवर झालेल्या या कारवाईने विभागात खळबळ उडाली आहे. मंगळवारी केलेल्या या कारवाईत लोकायुक्त पथकाने 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 14 वाहने जप्त केली आहेत.
पोलीस उपअधीक्षक (लोकायुक्त) जेपी वर्मा म्हणाले, "छापा मारताना आमच्या पथकाला 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता, फार्म हाऊस, वाहने, शेतजमीन, दागिने, 14 वाहने आणि इतर जीवनावश्यक वस्तू सापडल्या आहेत." आता याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे जेपी वर्मा यांनी सांगितले.
शिवपुरीमध्ये असेच प्रकरण आले होते समोर
दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशातही असेच प्रकरण समोर आले होते. ऑक्टोबर महिन्यात ईओडब्ल्यूने (EOW) शिवपुरी जिल्ह्यातील सहाय्यक समिती व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात महिन्याचे 12 हजार रुपये पगार घेणाऱ्या व्यवस्थापकाच्या घरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली. शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस तालुक्यातील पाचवली सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आला होता. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ईओडब्ल्यूच्या पथकाने विजयपुरम कॉलनीत राहणारे एमएस भार्गव यांच्या घरावर छापा टाकून कारवाई केली.